अभिषेक बच्चन (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच ‘दसवी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून  यामध्ये अभिषेक एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. अभिषेकने आपल्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत दसवी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याचे सांगितले आहे.

अभिषेकने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील त्याच्या लूकचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले की, ‘भेटा गंगा राम चौधरीला. आजपासून दसवी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु’. तुषार जलोटा यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या ‘दसवी’ या चित्रपटात अभिषेक एक अडाणी, लालची आणि भ्रष्ट राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. जो पुढे जाऊन मुख्यमंत्रीसुद्धा होतो. त्या राजकारणी व्यक्तीला तुरुंगातसुद्धा जावे लागते. तिथे तो कष्टाच्या कामापासून वाचण्यासाठी दहावीची परिक्षा देण्याची तयारी करतो. याद्वारे अभिषेकला शिक्षणाचे महत्त्व समजते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

या चित्रपटात यामी गौतम ज्योती देसवाल नावाच्या जेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री निमरत कौर, अभिषेक बच्चनची पत्नी विमला देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघींचाही चित्रपटातील लूक समोर आला असून अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हे पोस्टर शेअर केले आहे.

चित्रपट निर्माते दिनेश विजन यांनी खूप दिवसापूर्वीच अभिषेकला ‘दसवी’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. दोघांनीही या चित्रपटाच्या चित्रीकरणास जूनमध्ये सुरुवात करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्रातील सर्व काम थांबले. त्यामुळे आता चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या आपल्या व्यावसायिक आयुष्यात खूप व्यग्र आहे. मागील वर्षी तो अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या ‘ब्रीद इन टू द शॅडो’ या चित्रपटात आणि नेट फ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लूडो’ या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर आता तो ‘दसवी’शिवाय ‘द बिग बुल’ आणि ‘बॉस बिस्वास’ या चित्रपटात दिसणार आहे.