अभिनेता रणजित

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा मुद्द्याने डोकं वर काढले आहे. या मुद्यावरून अनेक कलाकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता या  वादात आणखीन एका प्रसिद्ध कलाकाराने उडी घेतली आहे. खलनायकाच्या भूमिकेतून नावारूपास आलेले रणजित यांनी देखील त्यांच्या काळात चालत आलेल्या घराणेशाहीवर भाष्य केले आहे.

७७ वर्षांचे रणजित इंडियन एक्स्प्रे्सशी बोलताना असे म्हणाले की, “घराणेशाही या आधीही होती. इतकेच काय तर तेव्हा देखील कलाकारांमध्ये स्पर्धा होती.  मला आठवतंय की सिलसिला या सुप्रसिद्ध चित्रपटासाठी परवीन बाबीची निवड झाली होती.  पण का कुणास ठाऊक निर्मात्याला असे वाटले की परवीनऐवजी जया बच्चन या भूमिकेसाठी चांगल्या दिसतील. आणि त्यानंतर परवीन बाबीच्या जागी जया बच्चन यांची निवड केली गेली.

याचप्रमाणे शोले या चित्रपटासाठी पहिल्यांदा डॅनीला विचारण्यात आले होते.  पण तो व्यग्र असल्या कारणाने  त्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आले परंतु डॅनी माझा चांगला मित्र होता म्हणून मी ही भूमिका नाकारली. यानंतर ही भूमिका कोणा दुसर्‍याच्या नशिबी आली. तर अशा गोष्टी घडतच राहतात. मी कोणत्याही गटात नव्हता परंतु माझे  सर्वांशी चांगले संबंध होते आणि मला सर्वांकडून भरपूर प्रेम ही मिळाले.”

रणजित यांनी या मुलाखतीत सांगितले की त्यांचा मुलगा चिरंजीव हा देखील चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.  ते असे म्हणाले, ” तो सध्या तयारी करत आहे. मी त्याच्या आवडी निवडींमध्ये जास्त हस्तक्षेप करत नाही कारण तो माझ्यापेक्षाही  हुशार आहे.

या मुलाखतीच्या निमित्ताने रणजित यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. चित्रीकरणा दरम्यानचा एक किस्सा सांगताना ते  म्हणाले, “त्या काळात, कलाकारांना उन्हाळ्यात शूटिंग करताना खूप त्रास व्हायचा. आम्ही सर्व कलाकार एकच  व्हॅनिटी व्हॅन वापरायचो आणि सर्व एका कुटुंबासारखे राहायचो. मला देखील तेव्हा काम करताना  खूप आनंद मिळायचा.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *