urmila matondkar joins shivsena

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. उर्मिला मातोंडकरांनी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत सक्रीय राजकारणात पुन्हा प्रवेश केलाय. गेल्या वर्षी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिला मातोंडकरांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांना निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला. त्यावेळी उर्मिला यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर पराभवाचे खापर फोडले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

काँग्रेसचा हात सोडल्यानंतर उर्मिला मातोंडकरांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना पूर्णविराम देत अखेर त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उर्मिला मातोंडकरांना विधान परिषदेत पाठवण्याच्या तयारीत आहेत.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने उर्माला मातोंडकरांच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने प्रत्येक ४-४ जणांच्या नावांची यादी राजपालांकडे पाठवली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केलेय. त्यांनी १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नरसिंहा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कौन’, ‘जंगल’, ‘मस्त’, ‘जुदाई’, ‘प्यार तुने क्या किया’ अशा अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.