अध्ययन सुमन (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने स्वतःच्या आत्महत्येच्या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अध्ययनने आत्महत्या केल्याचे वृत्त एका वाहिनीवर चालवण्यात आले होते. त्यानंतर ही बातमी सर्वत्र वेगाने पसरली. मात्र, हे वृत्त खोटे असून या वृत्तामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसल्याचे अध्ययनने म्हटले आहे. तसेच यासाठी तो वाहिनीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

अध्ययनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर अध्ययनचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अध्ययनला त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताबाबत विचारण्यात आले असता त्याने म्हटले की, ‘मी जर आत्महत्या केली असेल तर आता तुमच्याशी कदाचित भूत बोलत असेल. हे सर्व खूपच निंदनीय आहे. त्यावेळी मी मिटिंगमध्ये होतो. त्यानंतर मला सर्वांचे फोन यायला सुरुवात झाली. मात्र, मिटिंगमध्ये असल्याने मी कोणाचे फोन रिसिव्ह केले नाही. त्यामुळे सर्वजण घाबरले होते. यावेळी माझ्या आईनेसुद्धा मला फोन केला होता. मात्र, मी तिचाही फोन उचलला नाही. त्यामुळे तीसुद्धा खूपच घाबरली. त्यानंतर मी तिला फोन केल्यावर तेव्हा कुठे ती शांत झाली. तसेच ही बातमी ऐकून मीसुद्धा खूपच हैराण झालो होतो. आताही मला अनेकांचे फोन येत आहेत.

अध्ययनने पुढे सांगितले की, या घटनेमुळे माझ्या आईला फार मोठा धक्का बसला आहे. कारण साहजिक आहे, आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यावर कोणत्याही आई-वडिलांना धक्काच बसणार. हे खूपच चुकीचे आहे. तसेच असे वृत्त देण्याचे काय कारण आहे ? मी माझ्या आयुष्यात फार आनंदी आहे. मला आत्महत्या करण्याची काय गरज आहे ? आणि माझे तर म्हणणे आहे की, कोणीही अशाप्रकारे कधी चुकीचे पाऊल उचलू नये. अशाप्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत चुकीचे कसे काय बोलू शकता ? असे करताना लाज वाटली पाहिजे. अशा शब्दांत अध्यनने खडसावले आहे.

अध्ययनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरही एक व्हिडीओ शेअर करत तो ठीक असल्याचे सांगितले होते. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘मी आत्महत्या केलेलो नाही. हे खूपच भयानक आहे. काही मीडिया संस्थांना काय झालं आहे ? माझ्यासोबत किंवा माझ्या आई-वडिलांसोबत असे करण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही. लवकरच मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. तयार राहा’असे अध्ययनने म्हटले आहे.