बॉलीवूडमधील अभिनेता अक्षय कुमार त्याच्या जुन्या व्हिडीओमुळे नव्याने चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याने सांगितले की, तो त्याच्या मुलीला रामसेतु निर्मितीमध्ये खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट सांगत होता. त्याचप्रमाणे नागरिकांनीही खार आणि वानर बनून योगदान देण्याचे आवाहन त्याने केले होते. आता त्याचा जुना व्हिडीओही माध्यमांसमोर आला आहे, ज्यामध्ये तो मंदिरात दान करण्याला विरोध करताना दिसतो. त्याच्या या जुन्या व्हिडीओमुळे तो वादात सापडला असून त्याच्यावर टीका होत आहे.
अक्षय कुमार विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेताना दिसतो तसेच लोकांमध्ये विविध गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो सातत्याने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. सोशल मीडियावर एक्टिव्ह असलेला हा अभिनेता यामुळे चर्चेतही असतो. पण आता त्याच्या एका जुन्या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. माध्यमांमध्ये आलेला अक्षयचा हा जुना व्हिडीओ 2012 मधील आहे, जेव्हा त्याची ‘ओएमजी’ ही फिल्म प्रदर्शित झाली होती. त्यावेळी एका न्यूज चॅनलवर तो आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, देवाच्या नावाखाली लोक दूध आणि तेल वाया घालवतात.
True Words pic.twitter.com/VgkqpgFnE4
— Puneet Sharma – पुनीत शर्मा – پُنیت شرما (@PuneetVuneet) January 17, 2021
या व्हिडीओमध्ये तो म्हणाला होता, ‘मंदिरात खूप काही वाया जाते. जर देवासाठी काही करायचे असेल तर गरजूंना मदत करणे जास्त चांगले. असे कुठे लिहिले आहे की देवाला दूध लागते. शेतकरी भुकेने मरत असताना वैष्णो देवीसारख्या मंदिरात जाण्याऐवजी ते पैसे कोणा गरजू व्यक्तीला द्यावेत.’ आता हा व्हिडीओ माध्यमांसमोर आल्यानंतर लोक अक्षय कुमारला सवाल करत आहेत की, ‘त्याचे मन कसे काय बदलले.’ कारण देशभरात 14 जानेवारीपासून अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर करत, आपण देणगी दिली असल्याचे सांगत नागरिकांनाही देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. त्यामुळे आता अक्षय कुमारवर टीका होत असून यूजर त्याला त्याच्या जुन्या व्हिडीओवरून प्रश्न विचारत आहेत.