अक्षय कुमार (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

अक्षय कुमारचा आगामी ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानंतर आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवीन माहिती समोर येत आहे. बातम्यांनुसार अक्षयचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा विचार करण्यात येत आहे. पूर्वी असे सांगितले जात होते की, सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र, आता हा विचार बदलण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे सिनेमागृह मालक आणि प्रेक्षकांना निराशा होऊ शकते.

अक्षयचा यापूर्वी ‘लक्ष्मी’ हा चित्रपटसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तर आता अक्षयचा आणखी एक मोठा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा विचार करण्यात येत आहे. रिपोर्टनुसार बेलबॉटमचे निर्माते जॅकी भगनानी आणि वासु भगनानी अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नाही.

‘बेलबॉटम’ या चित्रपटाचा टीझर ‘लक्ष्मी’ या चित्रपटापूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच यामध्ये सांगण्यात आले होते की, हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. २ एप्रिल २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामुळे आता ते होऊ शकणार नाही. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही याचदरम्यान आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहता ‘बेलबॉटम’ या चित्रपटासाठी आता डीजिटल प्लॅटफॉर्मच योग्य असल्याचे निर्माते विचार करत आहेत.

‘बेलबॉटम’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच फारच चर्चेत आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर चित्रीकरण करणारा अक्षय कुमार हा पहिला बॉलिवूड अभिनेता होता. बेलबॉटमसाठी तो चित्रपटातील कलाकार हुमा कुरैशी, वाणी कपूर, लारा दत्ता आणि संपूर्ण टीमसोबत ब्रिटेनला गेला होता. तिथे त्याने ३५ दिवसात चित्रीकरण पूर्ण करून भारतात परतला.