सूर्यवंशी आणि ८३ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने सिनेमागृह बंद होते. त्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर सिनेमागृह सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली. मात्र, तरीही अनेक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. अशात अनेक प्रेक्षक सिनेमागृहात मोठे चित्रपट पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर अशा प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी पूर्ण झालेले ‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ हे दोन मोठे चित्रपट अनुक्रमे मार्च आणि एप्रिलमध्ये प्रदर्शित (Akshay Kumar’s Sooryavanshi And Ranveer Singh’s 83 Movie Release Date In 2021) होऊ शकतात.

रिपोर्टनुसार, रिलायन्स एंटरटेनमेंट अक्षय कुमार अभिनित ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंह अभिनित ‘८३’ हे आपले दोन चित्रपट मार्च आणि एप्रिलमध्ये प्रदर्शित करण्याची योजना करत आहेत. त्यानुसार सर्वकाही योजनेनुसार झाल्यास होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना सूर्यवंशी चित्रपट पाहण्यास मिळणार आहे.

दैनिक भास्करशी बोलताना व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या प्रदर्शन तारखा लक्षात घेत यावर्षी दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले. मार्चमध्ये सूर्यवंशी प्रदर्शित होणार आणि त्यानंतर ८३. योजनेनुसार रणवीर सिंहचा चित्रपट एप्रिलच्या शेवटपर्यंत पडद्यावर येणे अपेक्षित आहे. निर्माते अपेक्षा ठेवत आहेत की, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह दोघेही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्यास यशस्वी होणार.

रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला सूर्यवंशी हा चित्रपट २४ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. यामध्ये अक्षय कुमारशिवाय, कटरिना कैफ, अजय देवगन, रणवीर सिंह आणि गुलशन ग्रोवर यांनी मुख्य भूमिका साकारली आहेत. तर कबीर खान यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला रणवीर सिंहचा ८३ हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन आणि बोमन ईरानी यासारखे अनेक कलाकार दिसणार आहेत.