‘चंडीगड करे आशिकी’नंतर या वर्षी 17 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आयुष्यान खुरानाचा आणखी एक चित्रपट / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

गेल्या काही दिवसांत ‘कोरोना’चे संक्रमण कमी होताना दिसत असल्यामुळे ‘अनलॉक’च्या प्रक्रियेअंतर्गत देशभरात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटगृह मालक, निर्माते, कलाकारांबरोबरच प्रेक्षकांमध्येही उत्साह दिसत असतनाच पुन्हा चित्रपटगृहांबाबत काही निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘कोरोना’चे रुग्ण वाढत असून लॉकडाऊनची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी दुसरीकडे बॉलीवूडमधील निर्माते त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहेत. ‘चंडीगड करे आशिकी’ या चित्रपटानंतर आता आयुष्मान खुरानाच्या आणखी एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.

आयुष्मान खुरानाची ‘चंडीगड करे आशिकी’ ही फिल्म या वर्षी 9 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत असून अभिषेक कपूर यांनी ‘टी-सिरीज’सोबत मिळून ही फिल्म बनविली आहे. आता अनुभव सिन्हा दिग्दर्शित फिल्म ‘अनेक’ या वर्षी 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. सध्या या चित्रपटाचे शुटिंग भारताच्या उत्तर पूर्व भागात सुरू आहे.

‘अनेक’ ही एक जासूसी थ्रिलर फिल्म असल्याचे सांगितले जात असून या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभव सिन्हा पुन्हा ‘टी-सिरीज’मध्ये परतत असल्याचे बोलले जात आहे. या वर्षी जुलै आणि सप्टेंबर या महिन्यांत आयुष्मान खुरानाचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असून जुलैमध्ये आणखीही काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये 2 जुलैला दक्षिण भारतीय फिल्म ‘मेजर’ आणि सिद्धार्थ मल्होत्राची फिल्म ‘शेरशाह’ प्रदर्शित होणार आहे. तर बहुचर्चित ‘केजीएफ चॅप्टर 2’ आणि अभिनेता प्रभास याचा ‘राधे श्याम’ हे चित्रपटही जुलैमध्येच प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

ऑगस्टमध्ये 6 रोजी अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा ‘अतरंगी रे’ चित्रपट तर 13 रोजी दक्षिण भारतीय चित्रपट ‘पुष्पा’ आणि जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. सप्टेंबरमध्ये ‘शर्माजी नमकीन’ आणि ‘लायगर’ यांसारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

ayushmann khurrana starrer film anek to release on september