अभिनेता सोनू सूद आणि बृह्नमुंबई महानगरपालिका (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचे सर्वांनीच कौतुक केले. या कार्यामुळे तो चांंगलाच चर्चेतही आला होता. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमध्ये मुंबई महापालिकेने सोनू सूदवर आरोप करत म्हटले आहे की, तो एक सराईत गुन्हेगार आहे. दोनवेळा पालिकेने कारवाई करुनही सोनूने जुहूमधील त्याच्या इमारतीमध्ये अवैध बांधकाम केले आहे. याच इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप करत मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीला सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्यालाच उत्तर देताना पालिकेने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर हा आरोप केला आहे.

पालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, सोनू हा सराईत गुन्हेगार आहे, शिवाय तो चुकीच्या पद्धतीने पैसे कमावू इच्छित आहे. यात पालिकेनं स्पष्ट केलंय की सोनू सूदनं कोणताही परवाना न घेता एका निवासी इमारतीत हॉटेल सुरु करुन मुंबई महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे. या शिवाय त्या इमारतीत बेकायदेशीर बदल करत एमआरटीपी कायदाही मोडला आहे. या करता पालिकेच्यावतीने त्याला वारंवार नोटीसही बजावून कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरुच आहे असा आरोप करताना व्यावसायिक दराने नळ जोडणी घेणंही सोनूने आवश्यक मानले नाही, असे महापालिकेने सांगितले आहे. या सोबतच त्याने केलेल्या अवैध बांधकामावरुन पालिकेने त्याला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट – सोनूने मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत सोनूने शरद पवार यांना सांगितले की, त्याने कोणतेही अवैध बांधकाम केले नाही. काही लोक त्याला बदनाम करु इच्छित आहे, असे तो पवारांना म्हणाल्याचे सांगण्यात येत आहे.