या व्हिडिओमुळे काजोल होत आहे ट्रोल (फोटो - सोशल मीडियावरून साभार)

कोरोनाच्या या संकटकाळात संपूर्ण देश सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या एकीकडे देशात चिंता वाढवत आहे. तर दुसरीकडे या रूग्णांसाठी बेड्स उपलब्ध नसणे, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणे तसेच योग्य आहार न मिळणे, अशा समस्याही समोर येत आहेत. अशात अनेक लोक पुढे येत निढळ हस्ते लोकांची मदत करत आहेत. तसेच अनेक कलाकारही त्यांच्या परीने जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती निंजा पद्धतीने सफरचंद कापताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

काजोलने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडिओत दिसत आहे की, ती सफरचंद हवेत उडवून चाकूने ते दोन भागात कापते. त्यामुळे सफरचंदाचे दोन तुकडे होऊन ते जमिनीवर पडतात. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, ‘मूड’. काजोलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनेकजण तिच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. तर काहींना मात्र, सफरचंद कापण्याची काजोलची ही पद्धत रूचली नाही. त्यामुळे ते तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. काजोलच्या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘लोक भुकेने मरत आहेत. त्यांची चेष्टा करू नका. अन्नाची नासाडी करू नका’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘अशाप्रकारे खाण्याचे पदार्थ वाया घालवू नका. अनेक लोक एवढेसे अन्न मिळवण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अशाप्रकारच्या पोस्ट्ना प्रोत्साहन देऊ नका’.

काजोलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास मागील वर्षी तिचा ‘देवी’ नावाचा एक लघुपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘त्रिभंगा’ या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यामधील तिच्या अभिनयाची खूपच प्रशंसा करण्यात आली होती.