आता यामुळे कंगना राणावत आली अडचणीत; पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावले समन / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

सध्या सोशल मीडियावर या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेली बॉलीवूडमधील अभिनेत्री आहे कंगना राणावत. विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती आपली मते मांडते. यावरून ती कधी कोणावर निशाणा साधते तर कधी कोणाला लक्ष्य करते. यामुळे ती कधी वादातही सापडली तर कधी केलेले ट्विट डिलिट करून त्यावर स्पष्टीकरण देण्याचीही वेळ तिच्यावर आली. आता पुन्हा एकदा ती अडचणीत सापडली आहे. प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी कंगनाविरोधात चुकीची वक्तव्ये केल्याचा आरोप करून अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणात मुंबईच्या जुहू पोलिसांनी येत्या 22 जानेवारी रोजी हजर राहण्याबाबत तिला समन बजावले.

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनावर आरोप केला होता की, तिने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी अख्तर यांच्या वतीने कंगनाच्या वक्तव्याचे रेकॉर्डिंगही ऐकवण्यात आले होते. त्यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, जावेद अख्तर यांनी गेल्या 55 वर्षांत आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे आणि त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी कंगना राणावतने टीव्ही आणि सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात काही निराधार वक्तव्ये केली.

सुनावणीदरम्यान कोर्टाने पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आणि त्याचा संपूर्ण अहवाल 16 जानेवारी रोजी कोर्टात सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. पोलिसांनी अहवाल सुपूर्द करण्यासाठी 16 जानेवारी रोजी कोर्टाकडे आणखी मुदत मागितली. त्यावर कोर्टाने अहवालासाठी मुदतवाढ देऊन 1 फेब्रुवारीपर्यंत तो सादर करण्यास सांगितले.

कंगनाने या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून तिच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला. तिने म्हटले होते की, ‘जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावून धमकावले आणि अभिनेता ऋतिक रोशन याची माफी मागण्यास सांगितले होते.’ त्यानंतर जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर आपला जबाब नोंदवला होता. कंगनाने एका ट्विटमध्येही म्हटले होते, ‘जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावून धमकावले आणि ऋतिक रोशनची माफी मागण्यास सांगितले. महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती, कारण तिने त्यांच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका करण्यास नकार दिला होता. ते पंतप्रधानांना फाशीवादी म्हणतात…काका तुम्ही दोघे काय आहात?’

kangana ranaut has been summoned in javed akhtar defamation case