सुशांत सिंहच्या मृत्यूवर विनोद करणे या स्टँड-अप कॉमेडियनला पडले महाग; चाहत्यांनी ट्रोल केल्यावर मागितली माफी / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

मुंबईमधील स्टँड-अप कॉमेडियन डॅनियल फर्नांडीस याने आपल्या एका कार्यक्रमात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूवरून विनोद केला होता. या कार्यक्रमाच्या काही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या क्लिप व्हायरल झाल्यानंतर लगेचच सुशांत सिंहच्या चाहत्यांनी डॅनियलला ट्रोल करायला सुरुवात केली. त्याच्यावर खूप टीकाही झाली. सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगमुळे अखेर डॅनियल याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून सुशांत सिंहच्या चाहत्यांची माफी मागितली.

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात अद्याप आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेला आज सात महिने पूर्ण झाले. पण अद्याप या प्रकरणातील सत्य समोर येत नसल्याने या अभिनेत्याचे चाहते त्याला न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. अशात मुंबईचा स्टँड-अप कॉमेडियन डॅनियल फर्नांडीस याला या अभिनेत्याच्या मृत्यूवर विनोद करणे महागात पडले. या अभिनेत्याच्या चाहत्यांकडून ट्रोल झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावर त्यासाठी माफीही मागावी लागली.

ज्या कार्यक्रमात डॅनियलने हे विनोद केले होते त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तो सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आणि रिया चक्रवर्तीवर लावण्यात आलेल्य आरोपांवर विनोद करताना दिसतो. सुशांतच्या मृत्यूवर विनोद करतानाच तो म्हणतो की, रिया चक्रवर्तीसंदर्भात संपूर्ण देश ऑब्सेस्ड झाला आहे. त्याचबरोबर मेंटल हेल्थ आणि जस्टीस फॉर सुशांत या हॅशटॅगवरूनही तो विनोद करताना दिसतो. यात तो कंगना राणावतला सीबीआय संचालक म्हणताना दिसतो. जेव्हापासून या क्लिप व्हायरल झाल्या आहेत तेव्हापासून त्याच्यावर टीका होत आहे. सुशांतचे चाहते सोशल मीडियावर डॅनियलला चांगलेच ट्रोल करत आहेत. काहींनी तर त्याला अटक करण्याची मागणीही केली.

सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाल्यानंतर आता डॅनियलने एक पोस्ट शेअर करून सुशांतच्या चाहत्याची माफी मागितली. आपल्या माफीनाम्यामध्ये तो म्हणतो, ‘माझ्या अलिकडच्या स्टँड-अप व्हिडीओमुळे स्वर्गीय सुशांत सिंह राजपूत यांचे चाहते नाराज झाले. ज्यापैकी काहींनी मला माझी मागण्याचा आदेश दिला आणि मी त्याच्याशी सहमत आहे. एक कॉमेडियन म्हणून नेहमी आपले मनोरंजन करण्याचाच माझा उद्देश असतो. पण कधी कधी या प्रयत्नात शक्य आहे की माझी एखादी चूकही होऊ शकते. मी माझ्या चुकीसाठी माफी मागतो आणि माझे शब्द मागे घेतो, ज्यांमुळे सुशांतच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.’

comedian daniel fernandes issued apology for joking about sushant singh death