अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता अक्षय कुमार (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार आणि ‘मस्तानी गर्ल’ अभिनेत्री दीपिका पादूकोण यांना नुकताच दादासाहेब फाळके उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. स्टार-स्टॅड नाईटमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदानाबद्दल या प्रतिभावान कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे. ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल’ अवॉर्ड सोहळ्यात उत्तम अभिनयाकरिता अक्षय आणि दीपिकाचा सन्मान करण्यात आला आहे. २० फेब्रुवारीला मुंबईमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची घोषणा करण्यात आली आहे. दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ल्यावर आधारित होता. यात पीडितेची प्रमुख भूमिका दीपिकाने साकारली होती. ‘लक्ष्मी’ हा हॉरर चित्रपट लैंगिक समानतेच्या विषयावर आधारित होता. यामध्ये लक्ष्मीची भूमिका अक्षय कुमारने साकारली होती. त्याचा हा सिनेमा कोरोनामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता तर दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीनेही प्रमुख भूमिका साकारली होती. विक्रांतलाही सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी गौरवण्यात आले आहे.

या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणीने ‘क्रिटिक्सची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार जिंकला आहे. अभिनेत्री सुश्मीता सेनला ‘बेस्ट अ‍ॅक्ट्रेस फॉर वेब सीरिज’ या अंतर्गत पुरस्कार मिळाला. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओललाही त्याची गाजलेली वेबसिरीज ‘आश्रम’ साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल’ अवॉर्ड सोहळ्यात त्याचा वेबसिरीज या कॅटेगिरीअंतर्गत उत्तम अभिनयासाठी गौरव करण्यात आला.