पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या (PIFF) नव्या तारखा जाहीर; 4 मार्च रोजी होणार उद्घाटन / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

प्राची बारी

महाराष्ट्रातील चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नव्या तारखा या महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी बुधवारी जाहीर केल्या. जानेवारीमध्ये होणारा यंदाचा 19 वा चित्रपट महोत्सव कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आला असून आता येत्या 4 ते 11 मार्च या कालावधीत हा महोत्सव पुण्यात आयोजित करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले.

PIFF चे संचालक प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी यापूर्वी 14 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत चित्रपट महोत्सव होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, सध्याच्या परिस्थितीमुळे महोत्सव पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता महोत्सवाच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या. पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, ‘सध्याची ‘कोरोना’मुळे असलेली परिस्थिती लक्षात घेता यंदा हा महोत्सव दोन माध्यमांतून रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष थिएटरमध्ये येऊन रसिक चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. थिएटरमध्येही सुरक्षिततेसंदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पटेल म्हणाले, ‘गेले 2020 हे वर्ष अनिश्चिततेचे, भीतीचे आणि संघर्षाचे होते. या काळात निवडक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी त्यांचे मार्ग निवडले. यंदाच्या महाराष्ट्रातील या चित्रपट महोत्सवासाठी जगभरातील 93 देशांतून सुमारे 1611 चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, निवड समितीने त्यापैकी 180 चित्रपटांची विविध विभागांतून निवड केली असून ते या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. 2021 मधील हा महोत्सव कोविडच्या संकटामध्ये पुढे राहून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांना समर्पित आहे’, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या बजेट सेशनमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी PIFF साठी 4 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केल्याची माहिती डॉ. पटेल यांनी यावेळी दिली. ‘परंतु, सध्याची महामारीची परिस्थिती पाहता आम्ही राज्य सरकारला यावर्षी महोत्सवासाठी 2.5 कोटी रुपये देण्याची विनंती केली आहे’, अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी यावेळी दिली.

dr jabbar patel had announced new dates of piff