अभिनेत्री कंगना राणावत (इन्स्टाग्रामवरून साभार)

वादग्रस्त आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावतने आता एक खळबळजनक दावा केला आहे. तिच्या घरासमोर शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा आवाज तिने ऐकला. तब्बल तीनवेळा फायरिंग करण्यात आली. ही फायरिंग माझ्या तीन मजली घरासमोर आणि माझ्या खोलीसमोर करण्यात आली. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मुलावर निशाणा साधल्यावर अशी घटना घडणे हा केवळ योगायोग नसल्याचे कंगनाचे म्हणणे आहे. मला कोणीतरी घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना मी सांगू इच्छिते की, सुशांत घाबरला, मात्र मी घाबरणार नाही.

शुक्रवारच्या या घटनेनंतर कंगनाने लगेच याबाबत पोलिसांत रिपोर्ट केल्यानंतर कुल्लू पोलिसांनी तपासणी केल्यावर मात्र हा दावा फेटाळला आहे. मात्र कंगना आपल्या दाव्यावर ठाम आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. दरम्यान कंगनाच्या तक्रारींनंतर याठिकाणी पोलिसांची एक टीम तैनात करण्यात आली आहे, जी येणाऱ्या-जाणाऱ्या संशयास्पद व्यक्तींचा तपास करत आहे.

कंगनाने या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. ती म्हणाली की, शुक्रवारी मी माझ्या बेडरूममध्ये होते तेव्हा रात्रीचे साधारण ११.३० वाजले असणार. तेव्हा पहिला आवाज झाला. मला पहिल्यांदा फटका वाजल्यासारखा आवाज वाटला म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर ८ सेकंदांच्या अंतराने दोन आवाज झाले. त्याने मी सतर्क झाले. कारण तो गोळी झाडल्यासारखा आवाज आहे, हे मला जाणवले. मी सिक्युरिटीला फोन करून विचारले तर त्याने कदाचित काही मुलं असतील, फटाके वाजवत असतील किंवा इतर काही आवाज असेल. कदाचित त्याने नीट आवाज ऐकला नसेल पण आम्ही घरात ५ सदस्य होतो आणि आवाज ऐकला, त्यांना तो गोळी चालविण्याचाच आवाज वाटला. म्हणून आम्ही पोलिसांना संपर्क केला.

कंगनाच्या तक्रारीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांना प्रथमदर्शनी काही दिसले नाही. या परिसरात असणाऱ्या वटवाघळाना हाकलण्यासाठी कुणीतरी आवाज केला असू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. याठिकाणी असणाऱ्या बागेच्या मालकाशीही संपर्क साधून विचारले असता त्याने असा कोणताही आवाज आला नसल्याचे म्हटले आहे. मात्र कंगना आपल्या दाव्यावर ठाम आहे. माझ्या स्टाफने कधी याठिकाणी वटवाघळाना हाकलण्यासाठी असा आवाज केल्याचे ऐकलेले नाही, किमान रात्री तरी नक्कीच नाही. ती म्हणते की, ७-८ हजार रुपयांत येथील कुणाला तरी हायर केले असणार, ही त्यांच्यासाठी मामुली बाब आहे.  त्यामुळे आता या घटनेचे गूढ वाढले आहे.

कंगनाने सुशांतसिंहला न्याय मिळण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी तिने काही दिवसांपूर्वीच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. एका न्यूज वेबसाईटने दावा केला आहे कि, सुशांतच्या मृत्यूआधी त्याच्या इथे पार्टी झाली, त्यात अनेक नामवंत हस्ती सामील झाल्या होत्या. कंगनाने हा धागा पकडून आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता ट्विटरवर लिहिले कि, सर्व जाणतात मात्र त्याचे कोणी नाव घेणार नाही. तो करण जोहरचा बेस्ट फेंड आहे आणि जगातील सर्वात चांगल्या मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. त्याला प्रेमाने बेबी पेंग्विन म्हणतात. यानंतर कंगना पुढे लिहिते कि, जर मी घरात लटकती मिळून आले तर कृपया हे लक्षात घ्या कि मी आत्महत्या नाही केली.

कंगनाच्या दाव्यात कितपत तथ्य, नक्कीच तिच्या अशा वादग्रस्त विधानांमुळे तिला कुणी फायरिंग करून घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे का? कि ही फक्त अफवाच आहे? दरम्यान कंगनाच्या तक्रारीनंतर तिला पोलिसांनी सुरक्षा पुरविली असून तीन पोलीस तिच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *