अभिनेता राज कपूर

पाकिस्तानातील पेशावर येथे राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली आहे. या हवेलीला कपूर हवेली म्हणून ओळखले जाते. पण ही हवेली लवकरच पाडण्यात येणार असल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्त संकेतस्थळांनी दिले आहे.

विविध संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजी मुहम्मद इसरार हा कपूर हवेलीचा सध्याचा मालक असून त्याला हवेलीच्या जागी मोठा व्यावसायिक मॉल उभारायचा आहे. इसरार हा व्यवसायाने सराफ आहे. त्याची पाकिस्तानात मोठी सराफी पेढी आहे.

२०१८ साली ऋषि कपूर यांच्या विनंतीस मान देऊन पाकिस्तानचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की, पेशावर येथील कपूर हवेलीचे सरकार संग्रहालयात रूपांतर करेल. पण आता इथे संग्रहालय होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कारण ही हवेली पाडण्यात येणार असल्याचे दिसते. या मालमत्तेचे सध्याचे मूल्य पाच कोटी रुपये आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू आहे.

यापूर्वी ही तीन ते चार वेळा या मालकाने इमारत पाडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा वेळोवेळी या मालकावर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पण आता हा मालक हट्टाला पेटला असून मागे हटायला तयार नाही, असे वृत्तात म्हटले आहे.

ही हवेली पृथ्वीराज कपूर यांच्या वडिलांची असून, पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांचा जन्म इथेच झाला. फाळणीनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे शहर सोडले. १९६८ साली एका स्थानिक रहिवाशाने ही इमारत लिलावात खरेदी केली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *