साजीद खानप्रमाणेच बॉलीवूडमधील या प्रसिद्ध दिग्दर्शकांवरही झाले आहेत छेडछाडीसह लैंगिक शोषणाचे आरोप / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्यावरील ‘डेथ इन बॉलीवूड’ या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्री फिल्ममुळे दिग्दर्शक साजीद खान चर्चेत आला आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये जियाची धाकटी बहीण करिश्मा हिने साजीदवर लैंगिक शोषणाचा आरोप करत, त्याने जियाला रिहर्सच्यावेळी टॉप आणि ब्रा काढायला सांगितले होते, असे सांगितले. करिश्मानंतर शर्लिन चोप्रानेही साजीदवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. यापूर्वीही 2018 मध्ये बॉलीवूडमधील #MeToo चळवळीच्यावेळी त्याच्या असिस्टंट डिरेक्टर महिलेसह सहा जणांनी साजीदवर असे आरोप केले आहेत. पण साजीद असा एकटाच दिग्दर्शक नाही ज्याच्यावर असे आरोप झाले. यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईंसह अन्य दिग्दर्शकांवरही असे आरोप झाले होते आणि त्यावेळी त्यावरून खूप चर्चा झाली होती.

करिश्मानंतर आता शर्लिनने सांगितले की, सहा वर्षांपूर्वी तिची साजीदशी भेट झाली. या भेटीवेळी साजीदने तिच्यासमोर अश्लील चाळे केले. तर, डिम्पल पॉल नावाच्या मॉडेलनेही साजीदवर आरोप केला आहे की, त्याने फिल्म ‘हाउसफुल’मध्ये भूमिका देण्याच्या नावाखाली तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील बोलला. याशिवाय त्याची असिस्टंट डिरेक्टर सलोनी चोप्रा, अभिनेत्री अहाना कुमरा, एक वरिष्ठ पत्रकार, मॉडेल अभिनेत्री रेशेल व्हाइट, सिमरन सुरी आणि प्रियांका बोस यांनीही साजीदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे साजीद सध्या चर्चेत असला तरी ब़ॉलीवूडमध्ये यापूर्वीही काही दिग्दर्शकांवर असे आरोप झाले आहेत, ज्यांची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.

बॉलीवूडमधील सर्वांत मोठ्या दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले राजकुमार हिरानी यांचेही नाव 2018 मध्ये #MeToo चळवळीमध्ये घेतले गेले. ‘संजू’ चित्रपटात सहायक दिग्दर्शक असलेल्या महिलेने त्यांच्यावर आरोप केला होता. पण याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, तसेच हे आरोप हिरानी यांनी फेटाळून लावले होते. प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही #MeToo चळवळीदरम्यान कॅट शर्मा या अभिनेत्रीने आरोप केला होता की, त्यांनी बर्थडे पार्टीसाठी घरी बोलावून कापलेल्या केकने बॉडी मसाज देण्यास सर्वांसमोर सांगितले होते, तसेच नंतर एका रूममध्ये बळजबरी किस करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने म्हटले होते. पुढे तिने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेतली होती. तर, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अन्य एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, घई यांनी आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळला होता.

‘क्वीन’ आणि ‘सुपर 30’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरही #MeToo अंतर्गत 2018 मध्ये त्यांच्या जुन्या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने छेडछाडीचा आरोप केला होता. पुढे तिने तक्रार मागे घेतल्याने रिलायन्स एन्टरटेन्मेंटने त्यांना ‘क्लीन चिट’ दिली. मुकेश छाबडा यांच्यावरही काही महिलांनी #MeToo अंतर्गत आरोप केल्यामुळे त्यांना त्यांची दिग्दर्शनाची डेब्यू फिल्म ‘दिल बेचारा’मधून हटविण्यात आले होते. पुढे क्लीन चिट मिळाल्यावर त्यांचे नाव या चित्रपटाशी पुन्हा जोडण्यात आले.

तर गीतिका त्यागी या अभिनेत्रीने 2014 मध्ये दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. स्वतः सुभाष कपूर यांना थप्पड मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केला होता. तिने सांगितले होते की, मे 2012 मध्ये सुभाष कपूर आणि त्यांचा सहकाही दानिश रजा तिच्या घरी आले आणि त्यानी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दीड वर्षांनंतर 2014 मध्ये तिने दोघांविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात अद्याप कपूर यांना ‘क्लीन चिट’ मिळालेली नाही.

बॉलीवूडमधील #MeToo चळवळीला सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने 2018 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तिला कपडे काढून इरफान खानसमोर डान्स करण्यास सांगितले होते. यावेळी ‘चॉकलेट’ फिल्मच्या सेटवर सुनील शेट्टी आणि इरफान खान तिच्या मदतीसाठी पुढे आले होते आणि त्यांनी विवेक यांच्या सूचनेला विरोध दर्शविला होता.

bollywood direcors who are accused of sexual harrasment