करीनाचा जुना व्हिडीओ झाला व्हायरल; दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत चाहते लावताहेत हा अंदाज / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानने शनिवारी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या बातमीमुळे करीना आणि सैफ अली खान यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह असून चाहते या दुसऱ्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण अद्याप या बाळाचा फोटो शेअर करण्यात आलेला नाही. चाहत्यांना या बाळाची झलक पाहण्याची जेवढी उत्सुकता आहे तेवढीच या बाळाच्या नावाबाबतही आहे. ‘सैफीना’ने पहिल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता या बाळाच्या नावाबाबत वेगवेगळे अंदाज लावण्यात येत असतानाच करीनाच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात तिने दुसऱ्या मुलाच्या नावासंदर्भात खुलासा केला होता.

‘सैफीना’चा पहिला मुलगा तैमूर सध्या सर्वांत जास्त फोटो काढला गेलेला जगातील पहिला मुलगा ठरला असून तो सेलिब्रिटी बनला आहे. करीना स्वतःही त्याची चाहती आहे. त्याचे ‘तैमूर’ हे नावही तिनेच निवडले होते. पण ‘तैमूर’ नाव ठेवल्यावरून अनेक संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला होता. मध्य आशियामध्ये ‘तैमूर’ साम्राज्याची स्थापना करणाऱ्या आणि 1398 मध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या ‘तैमूर’ याच्यावरून हे नाव ठेवण्यात आल्याचे म्हणत संघटनांनी त्याला विरोध केला होता.

पण त्यावर खुलासा करताना सैफ अली खान याने ‘तैमूर’चा अर्थ पोलाद असल्याचे सांगितले होते. हे नाव पर्शियन असून भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर शासकाचे नाव ‘तिमूर लिंग’ होते, असे त्याने स्पष्ट केले होते. ‘तैमूर’चा अर्थ ‘लोह’सुद्धा होतो असेही त्याने स्पष्ट केले होते. करीना दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सैफ अली खानने जाहीर केल्यापासूनच चाहते या दुसऱ्या बाळाच्या नावाबाबत अंदाज लावत होते. पण तैमूरच्या नावावरून झालेल्या वादानंतर आता दुसऱ्या बाळाच्या नावाबाबत आम्ही इतक्यात काही ठरवणार नाही, ते आयत्यावेळी पाहणार असल्याचे करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते. तिचा हा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

करीनाच्या या व्हिडीओवरून दुसऱ्या मुलाचे नाव ‘फैज’ ठेवले जाऊ शकते, असा अंदाज चाहते लावत आहेत. कारण हे नाव सैफ अली खान याने तैमूरच्या वेळी सुचवले होते, पण करीनाला तेव्हा ते तेवढे आवडले नव्हते. सैफच्या मते ‘फैज’ नाव खूपच रोमँटिक आहे. 2018 च्या जुन्या मुलाखतीत करीनाने सांगितले होते की, जर हा मुलगा असेल तर मला माझा मुलगा योद्धा व्हायला हवा आणि तैमूरचा अर्थ पोलाद असून मी पोलादी पुरुषाला जन्म देईन.’ आता करीनाचे चाहते तिच्या दुस-या मुलाचे नाव ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत.

kareena kapoor khan chose to name taimur for first child