कतरिनाची छोटी बहीण अभिनेत्री इसाबेल कैफ आणि अभिनेता पुलकित सम्राट(फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री कतरिना कैफचे आज जगभरात असंख्य चाहते आहेत. कतरिनाने मॉडेल म्हणून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती आज कतरिनाला बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आता लवकरच कतरिनाची छोटी बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती लवकरच ‘सुस्वागतम खुशामदीद’ या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक गुरुवारी समोर आला आहे. या चित्रपटात इसाबेल अभिनेता पुलकित सम्राटसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

पुलकितने या चित्रपटाचा फर्स्ट लूक इन्स्टाग्रामवर गुरुवारी शेअर केला आहे. त्याने पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पुलकितसोबत इसाबेल दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, नमस्ते आदाब, आता लवकरच सर्वांशी होईल भेट, सुस्वागतम खुशामदीदचा फर्स्ट लूक तुमच्यासमोर हाजीर आहे..! अशा खास शैलीत पुलकितने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या चित्रपटात पुलकित ‘अमर’ नावाच्या भूमिकेत दिसणार असून इसाबेल ‘नूर’ च्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिनाने ही पुलकितच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. धीरज कुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा फर्स्ट लूक चित्रपटातील एका गाण्याचा आहे.

यापूर्वी पुलकितने एक सेटवरील फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये इसाबेलचा चेहरा दिसत नव्हता, या पोस्टच्या कमेंटमध्ये त्याने माझी कोस्टार कोण आहे ? असा चाहत्यांना प्रश्न विचारला होता. आता कतरिनाप्रमाणेच चाहते इसाबेलला स्विकारतात का ? ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इसाबेल याआधी ‘माशाल्लाह’ या म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. आता या हिंदी चित्रपटातून ती अभिनयाचा श्रीगणेशा करणार आहे. या सोबतच इसाबेल सलमान निर्मिती करत असलेल्या ‘क्वाथा’ या चित्रपटात ही दिसणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता आयुष शर्मासोबत काम करताना दिसणार आहे.