बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आता लवकरच कतरिनाची छोटी बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती लवकरच ‘सुस्वागतम खुशामदीद’ या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच इसाबेल अभिनेता सूरज पांचोलीसोबत ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सूरजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली आहे.

या चित्रपटात इसाबेल, सूरजसोबत डान्स आणि रोमान्स करताना दिसणार आहे. सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सिनेमाचे २ पोस्टर रिलीज केले आहेत. एका पोस्टरमध्ये इसाबेल ही डान्सची पोझ देताना दिसत आहे तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये सूरज नृत्याची पोझ देताना दिसत आहे. दोघांचाही अंदाज एकदम हटके दिसत आहे. इसाबेलने लाल रंगाचा ड्रेस घातला असून सूरजने ब्लॅक कलरचा आऊटफीट घातला आहे. दोघेही सुंदर दिसत आहेत. हे दोन्ही पोस्टर शेअर करत सूरजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम टू डान्स’ १२ मार्चला येत आहे. यात नेटफ्लिक्स इंडियाचा उल्लेख त्याने केला आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. इसाबेलचा हा पदार्पणातला पहिलाच चित्रपट असू शकतो, शिवाय डिजिटल विश्वातही तिचा डेब्यू असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता कतरिनानंतर तिच्या बहीणीचा अर्थात इसाबेलाचा अभिनय पहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टेनली डिकोस्टा यांनी केले आहे. डिकोस्टा यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच इसाबेलाच्या ‘सुस्वागतम खुशामदीद’ या सिनेमातील काही पोस्टर्स आणि फोटो रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटातून ती अभिनेता पुलकित सम्राटसोबत दिसणार आहे. पुलकित या चित्रपटात ‘अमर’ नावाच्या भूमिकेत दिसणार असून इसाबेल ‘नूर’ च्या भूमिकेत दिसणार आहे. धीरज कुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.