दिग्दर्शक केदार शिंदे ( फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

महाराष्ट्रातील मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गांतर्गत शिक्षण आणि नोकरीमध्ये देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले. आरक्षण वैध ठरविण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्याचबरोबर या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या गायकवाड समितीचा अहवालही स्वीकारण्यायोग्य नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मराठा समाजातील नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नेमक्या शब्दांत आपली नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये केदार शिंदे यांनी म्हटले आहे की, आजचा मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक. आरक्षण नाही. भाषेला अभिजात दर्जा नाही. मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

 

केदार शिंदे हे आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांवर नेमकेपणाने भाष्य करीत असतात. मोजक्या पण नेमक्या शब्दांमध्ये ट्विट करून ते आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा त्यांना त्यांच्या भूमिकांवर काही जणांकडून ट्रोलही केले जाते. पण ते निर्भिडपणे भूमिका मांडतात.

देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशात ब्रिटिश हवे होते अजून काही वर्ष, असे म्हटले होते. केदार शिंदे यांनी लिहिलं होतं की, ‘भविष्यात वीज/गॅस प्रमाणे #Oxygen वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको. स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास. पण, दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वास सुध्दा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटिश हवे होते अजून काही वर्ष’..