विकास दुबेवर येणाऱ्या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिका साकारणार आहे. ही बातमी वाऱ्या सारखी सगळीकडे पसरली. पण ते वृत्त चुकीचे ठरले. (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

उत्तर प्रदेशमध्ये गेली तीन दशके गुन्हेगारी कृत्ये करणारा कुख्यात गुंड विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलिस चकमकीत मारला गेला. ही बातमी ऐकून सामान्य माणसाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही चर्चा रंगू लागल्या. काही माध्यमांनी तर असेही सांगितले की, विकास दुबेवर येणाऱ्या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिका साकारणार आहे. ही बातमी वाऱ्या सारखी सगळीकडे पसरली. पण ते वृत्त चुकीचे ठरले. अखेर मनोज वाजपेयीने या गोष्टीला पूर्णविराम दिला आहे. त्याने ट्विट करत हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

गँगस्टर विकास दुबेवर गेल्या ३० वर्षांत ६० हून अधिक गुन्हे दाखल होते. पण तो प्रकाशझोतात आला ते गेल्या शुक्रवारी त्याने केलेल्या आठ पोलिसांची निर्घृण हत्याकेल्यामुळे.
गुरुवारी त्याला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. उज्जैनहून त्याला कानपूरला आणत असताना पोलिसांच्या ताफ्यातले एक वाहन उलटले आणि ही संधी साधत विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यातच त्याचा एन्काऊंटर करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

 

हे झोप उडवणारे थरारक नाट्य एखाद्या चांगल्या चित्रपटासाठीची गोष्ट असू शकते असे अनेक बड्या निर्मात्यांनाही वाटून गेले. आणि यातूनच मनोज वाजपेयी सारख्या अभिनेत्याचे नाव पुढे आले.

ही घटना आपल्याला २००८ साली घडलेल्या एका गोष्टीची आठवण करून देते. २००८ साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा आणि अभिनेता मुलगा रितेश यांच्यासह दहशतवाद्यांचा हल्ला झालेल्या ताज हॉटेलला भेट दिली होती. तेव्हा अशी चर्चा सुरू झाली होती की, राम गोपाल वर्मा मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्यावर एक चित्रपट बनवणार आहेत. या एका प्रसंगामुळे देशमुखांनी स्वतःला एका नव्या वादात ओढून घेतले होते आणि याच करणासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

या गोष्टीवरून आपण हेच सांगू शकतो की आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये चित्रपटाची कथा शोधणाऱ्या निर्माते, दिग्दर्शकांनी या निमित्ताने आपले आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *