अभिनेत्री गायत्री दातार

‘प्लॅनेट मराठी’ हे नाव सध्या मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय बनलं आहे. याचाच एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट टॅलेंट’ (प्लॅनेट टी) बरोबर आजवर अनेक नामवंत चेहरे जोडले गेले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांच्यासह दिग्दर्शक संजय जाधवही प्लॅनेटशी जोडले गेले आहेत. तर आता अभिनेत्री गायत्री दातारचे नावही यामध्ये जोडलं गेलं आहे.

‘प्लॅनेट टॅलेंट’मधील तिच्या सहभागाबद्दल गायत्री म्हणते, ‘खरं सांगायचं तर ‘प्लॅनेट मराठी’च्या कुटुंबाचा मीही एक भाग झाल्याचा मला खूपच आनंद आहे. मी कुटुंब यासाठी म्हणतेय की, आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला कुटुंबाचा पाठिंबा, आधार असतो. चांगल्या-वाईट परिस्थितीत आपले कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतं आणि असचं माझं ‘प्लॅनेट’ सोबत जिव्हाळ्याच नातं आहे. माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यात ‘प्लॅनेट मराठी’ माझ्यासोबत असेल याची मला खात्री आहे. या कुटुंबासोबत अनेक दिग्गज जोडले गेले आहेत त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी चांगले साध्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. मी खूप नशीबवान आहे, की, मी ‘प्लॅनेट टॅलेंट’चा एक भाग आहे’.

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून ईशा अर्थात गायत्री दातार घराघरात पोहोचली. आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंरही ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून आपल्या विनोदी बुद्धीने आणि कॉमेडीचे अचूक टायमिंग साधत अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे.

याशिवाय गायत्री सध्या तिच्या ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ फोटोशूटमुळे आणि छोट्या पडद्यावरील तिच्या विविध कामांमुळे चर्चेत आहे. परंतु, अभिनयासोबतच तिला अॅडव्हेंचरमध्ये अधिक रस आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून तिने गिर्यारोहणाचे धडे घेतले आहेत. पुण्यातील एका ट्रेकिंग ऑर्गनायझेशनमध्ये तिने ट्रेक लीडर म्हणूनही काम केले आहे. गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर आता गायत्रीला माउंटेनिअरिंगचा पुढील अभ्यासक्रमही पूर्ण करायचा आहे. अशाप्रकारे मालिका, रिॲलिटी शो, नाटक या विविध माध्यमांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता गायत्री डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्लॅनेट मराठीचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. प्रादेशिक मनोरंजनापलीकडील दूरदृष्टी ठेवत मराठीसाठी निर्माण केलेलं हे डिजिटल व्यासपीठ प्रेक्षकांकडूनही तितकच पसंत केलं जाईल, असा मला विश्वास आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्दार्थ जाधवसुद्धा नुकतेच ‘प्लॅनेट टॅलेंट’ मध्ये सहभागी झाला. त्याच्यापाठोपाठ अभिनेत्री गायत्री दातारदेखील सहभागी होत आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या गायत्रीचे अभिनयातील विभिन्नतेचे टॅलेंट ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी म्हटले आहे.