साऊथ सुपरस्टार विजय थालपल्ली आणि चित्रपटाकरता लोकांची उसळलेली गर्दी (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील चित्रपटगृहे तब्बल ८ महिन्यांपासून बंद होती. आता सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर देशातली चित्रपटगृहे हळूहळू खुली होत आहेत. नुकताच साऊथ सुपरस्टार विजय थालपल्ली याचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्याकरता प्रेक्षकांनी तोबा गर्दी केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहेत. या गर्दीमुळे कोरोनासंदर्भात पाळण्यात येणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.

ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग – विजयच्या ‘मास्टर’ हा चित्रपट पाहण्याकरता प्रेक्षकांनी एक दिवस आधीच तिकीटे खरेदी केली होती. या करता प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या होत्या. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही गर्दी फक्त तामिळनाडूमध्येच नाही तर मुंबईतील सिनेमागृहांबाहेर आणि आतमध्ये देखील पहायला मिळाली आहे. चित्रपट आवडल्यानंतर त्याचा जल्लोष करताना चाहत्यांना मास्कचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे भान राहिले नाही. याचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कोरोना अजून पूर्णपणे संपला नाही, याची खबरदारी लोकांनी घ्यायला हवी.

मास्टर चित्रपट ३ भाषांमध्ये झाला प्रदर्शित – ‘मास्टर’ हा चित्रपट संक्रांतीच्या मुहूर्तावर देशात प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘मास्टर’ हा चित्रपट तमिळ,तेलुगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन देखील आज थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना हिंदीमध्ये हा चित्रपट पाहता येईल. मात्र, प्रेक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोना अजून संपलेला नाही, याचे भान आपण सर्वांनीच राखले पाहिजे.