अभिनेत्री, डान्सर नोरा फतेही (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

आपल्या बहारदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी आणि बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीला ओळखले जाते. नोरा अप्रतिम डान्स करते, बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांवर तिने डान्स केला आहे. नुकतीच नोराने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या बॉलिवूडमधील संघर्षाबद्दल सांगितले आहे. हा संघर्ष सांगताना नोराला अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. नोराने मुलाखतीत सांगितले की, ती जेव्हा कॅनडावरुन भारतात आली, त्यावेळी लोकांनी तोंडावर तिची चेष्टा केली होती. एवढंच काय तर तिचा पासपोर्ट देखील चोरी केला होता. कॅनडावरुन भारतात येताना नोराकडे फक्त ५००० रुपये होते.

लोक तोंडावर चेष्टा करायचे – दुबईचा युट्यूबर अनस बुखाशने तिची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना नोराने सांगितले की, मी भारतात येण्यापूर्वी खूपच उत्सुक होते, हा माझ्याकडे अनुभव कमी होता. परंतु, जेव्हा मी भारतात आले तेव्हा मला जाणवले की, मी जशी कल्पना केली होती तसं अजिबात नाही. काहींनी तर माझ्यासमोरच माझी चेष्टा केली होती. मला अनेकदा रिजेक्ट करण्यात आले होते. हे सगळे अनुभव खूप दु:खद होते. याला मी तितक्याच ताकदीने सामोरी गेले. नोराने पुढे सांगितले की, एका कास्टिंग डायरेक्टरने तिला ऑडिशन देण्याकरता बोलावले होते. त्याला माहित होते की, मी भारतीय नाही. परंतु, त्याने मुद्दाम मला हिंदी लाईन डायलॉगसाठी दिली होती. त्यानंतर तिथे असणारे लोक हे सगळे माझ्यावर हसले. त्यावेळी मी विचार केला की, अस वागण्याची यांची हिम्मत कशी झाली..? निदान माझ्या जाण्याची वाट पाहून माझ्या माघारी तरी हसायचं होतं असा वाईट अनुभव तिने सांगितला.

नोरा मूळची कॅनडा या देशातील मोरक्कोची रहिवासी आहे. नोराने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरबंन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने हिंदी आणि साऊथच्या सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. यामध्ये ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटाचा समावेश आहे. ‘बिग बॉस ९’ या रिआलिटी शोमध्ये नोरा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती, यातूनच तिला खरी ओळख मिळाली. नोरा अखेरची ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमातील तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे सुपरहिट झाले आहे. नोरा आता अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात दिसणार आहे.