हिरोपेक्षा जास्त मानधन घेत होते हे अभिनेते; अभिनयासाठी सरकारी नोकरीही सोडली होती / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलीवूडमध्ये काही कलाकारांनी साकारलेल्या भूमिका ते कलाकार आता हयात नसतानाही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मग ते त्यांनी साकारलेले खलनायक असोत किंवा चरित्र भूमिका असोत, त्यांच्या भूमिका त्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः जिवत केल्या. दिवंगत प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांनी ‘मि. इंडिया’ चित्रपटात साकारलेला ‘मोगँबो’, ‘शहेनशाह’ चित्रपटातील ‘जेके’ किंवा मग ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील ‘बाबूजी’ असो, या सर्व भूमिकांमधून या कलाकाराने आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी काही हॉलीवूडपटांतही भूमिका केल्या. त्यांच्या आवाजाचा आणि अभिनयाचा दरारा इतका होता की ते हिरोपेक्षा जास्त मानधन घेत होते. अभिनयासाठी त्यांनी सरकारी नोकरीही सोडली होती. त्यांच्यविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊ.

अमरीश पुही चित्रपटात येण्यापूर्वी नाटकांमधून काम करत होते. राज्य विमा निमगमध्ये ते नोकरी करत होते. दरम्यान, सुनील दत्त यांच्या ‘रेश्मा और शेरा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुखदेव यांनी अमरीश पुरी यांना एका नाटकात काम करताना पाहिले तेव्हा ते 40 वर्षांचे होते. त्यांचा अभिनय पाहून त्यांनी त्यांना ‘रेश्मा और शेरा’साठी विचारले आणि या चित्रपटाच्या माध्यमातून अमरीश पुरी यांनी ब़ॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर त्यांना चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्यामुळे आपली 21 वर्षांची सरकारी नोकरी सोडून ते चित्रपटांकडे वळले. त्यानंतर अनेक चित्रपटांतून काम करताना त्यांनी प्रामुख्याने खलनायकाच्याच भूमिका केल्या. त्यांचा अभिनय आणि आवाजाच्या जादूमुळे प्रेक्षक खूपच प्रभावीत होत असत. त्यामुळेच चित्रपटांत नायकापेक्षा जास्त मानधन ते घेत असत. एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपयांचे मानधन ते घेत.

त्यांनी सुमारे 400 चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या शिस्तीचा वाटा मोठा होता. अभिनयाकडे केवळ काम म्हणून ते पाहायचे नाहीत तर त्यामध्ये ते रमत असत. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या आवाजाचाही प्रेक्षकांवर खूपच प्रभाव पडायचा. आपल्या आवाजासाठी ते तासनतास सराव करायचे. त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या आणि प्रत्येक भूमिकेत त्यांना पसंत केले गेले. त्यांच्या नावाचा डंका हॉलीवूडपर्यंत वाजला होता. त्यामुळे हॉलीवूडचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी ‘इंडियाना जोन्स’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी अमरीश पुरी यांना अमेरिकेला बोलावले होते. अमरीश पुरी यांना त्यास स्पष्ट नकार देत, ऑडिशन घ्यायची असल्यास भारतात येण्याविषयी स्पीलबर्गना सांगितले. या चित्रपटात अमरीश पुरी यांनी नरबळी देणाऱ्या ‘मोलाराम’ या मांत्रिकाची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण जगात त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. 12 जानेवारी 2005 मध्ये कॅन्सरमुळे या अभिनेत्याचे निधन झाले. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

some unknown facts of legendary actor amrish puri