बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून २०२० ला गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर बॉलिवूडची घराणेशाही, माफिया अशा अनेक मुद्यांवरुन इंडस्ट्री अगदी ढवळून निघाली. या सगळ्यात अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडचे बडे बॅनर, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यावर आरोप केले होते. गुरुवारी सुशांतचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वच जण भावूक झाल्याचे दिसून आले होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटरवर ट्विट करत यशराज फिल्म्स, दिग्दर्शक महेश भट्ट, करण जोहर यांच्यावर पुन्हा आरोप केले आहेत.

मुव्ही माफियांनी तुला त्रास दिला –

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर सुशांतचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाने हे फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय सुशांत, तुला मुव्ही माफियांनी त्रास दिला, तुझा छळ केला. तू सोशल मीडियावर अनेकदा मदतीसाठी विनंती केली होतीस, परंतु, मी तुझी मदत करु शकले नाही याचे मला दु:ख होते. तू या मूव्ही माफियांचे टॉर्चर सहन करण्यास सक्षम आहेस असे मी गृहीत धरायला नको होते..! अशा शब्दांमध्ये कंगनाने हे ट्वीट केले आहे. तिने आणखी एक ट्विट करत लिहिले की, कधीच विसरु नका की, सुशांतने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर लिहिले होते की, काही मुव्ही माफिया त्याला फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर काढू इच्छित आहेत. त्याने फॉलोअर्सला चित्रपट यशस्वी होण्याकरता मदत मागितली होती. त्याने मुलाखतीमध्ये ही नेपोटिझमबाबत चर्चा केली होती. त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना फ्लॉप सांगण्यात आले होते..! अशा शब्दांमध्ये तिने ट्विट केले आहे.

कंगनाने आणखी एक ट्विट करत लिहिले की, हे कधीच विसरु नका की, सुशांतला यशराज फिल्म्सने त्याला बॅन केले होते त्यावर तो बोललाही होता. त्याने हेही सांगितले होते की, करण जोहरने त्याला कशी मोठी स्वप्ने दाखवली होती आणि त्याच्या चित्रपटाला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज केले होते. इतकचं नाही तर असे करुन सांगितले होते की, सुशांत एक फ्लॉप अभिनेता आहे..! अशा शब्दांमध्येही कंगनाने तिसरे ट्विट केले आहे. कंगनाच्या या ट्विट्सवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. काहींनी तिचे समर्थन केले तर काहींनी तिला ट्रोलही केले.