अभिनेत्री परिणिती चोप्रा (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा लवकरच तिच्या आगामी ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात परिणितीने ‘मीरा कपूर’ नावाच्या एका घटस्फोटित तरुणीची भूमिका निभावली आहे. ही तरुणी एम्नेसिया या आजाराने पीडीत आहे. या आजारामुळे ती तिच्या आयुष्यातील काही वर्षांमध्ये घडलेल्या घटना विसरत असते आणि याच दरम्यान ती एका खूनाच्या आरोपाखाली अडकते अशी कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने परिणितीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये ती तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर व्यक्त झाली आहे.

परिणितीला या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की, तिच्या खऱ्या आयुष्यात घडलेली एखादी वाईट घटना जर तिला तिच्या आठवणींमधून काढून टाकायची असेल तर ती गोष्ट कोणती आहे..? या प्रश्नाचे उत्तर देताना परिणिती म्हणाली की, मला असं वाटतं की मी जर त्या आठवणींना मिटवू शकले तर बरं होईल जेव्हा मी जाड होते. त्यावेळी मी कॉलेजमध्ये होते आणि मी खूपच खराब दिसायचे. आता मी पूर्ण बदलले आहे. आता मी तशी मुळीच नाही. आज मी हेल्दी फीट आयुष्य जगतेय. पूर्वीपेक्षा मी माझ्या आरोग्याच्या बाबतीत खूपच जागरुक आहे. मला वाटतं की मी काश्श त्या वेळच्या आठवणी मिटवू शकले तर किती बरं होईल. मला आजही माझे ते फोटो पाहिले की भीती वाटते. असे परिणिती म्हणाली.

चित्रपटाच कथानक असं काहीसं आहे – परिणिती या चित्रपटात एक घटस्फोटीत तरुणी दाखवण्यात आलेली आहे. ही तरुणी लंडनमध्ये राहते. ती रोज ट्रेनने तिच्या ऑफिस आणि नव्या घरापर्यंत प्रवास करत असते. योगायोगाने तिची ट्रेन तिच्या जुन्या घरापासूनच जात असते. या जुन्या घरात तिचा एक्स पती त्याच्या नव्या बायकोसोबत आणि मुलांसोबत राहत असतो. एक दिवस ट्रेनने प्रवास करताना त्या तरुणीला त्या जुन्या घरात असं काही विचित्र दिसतं की, ती ज्यामुळे आश्चर्यचकित होते, याच घटनेवर या सिनेमाची कथा आधारित  आहे. परंतु, त्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट पहावा लागेल.