ब्रँड व्हॅल्यूच्या यादीत टॉप ५ मध्ये बॉलिवूड कलाकारांनी मिळवले स्थान (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

अमेरिकेची सर्वे कंपनी ‘डफ अँड फेल्प्स’ द्वारे दरवर्षी जगभरातील वेगवेगळ्या देशातील प्रसिद्ध लोकांच्या लोकप्रियतेचे आकडे जाहीर करण्यात येते. भारतातील सेलिब्रिटींच्याबाबतही ही कंपनी आपला रिपोर्ट प्रसिद्ध करते. त्यानुसार मागील वर्षी म्हणजेच २०२० या वर्षातील आकडे गोळा करून कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार विराट कोहली सलग चौथ्यांदा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराटनंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव या यादीत समाविष्ट आहे. मात्र, या रिपोर्टनुसार २०२० मध्ये याचा सर्वात जास्त फटका प्रियंका चोप्राला बसला आहे.

सर्वात जास्त ब्रॅंड व्हॅल्यू असलेल्या व्यक्तींच्या यादीत २ ते १० हे क्रमांक बॉलिवूड कलाकारांनी पटकावले आहे. तर अक्षय कुमार, रणवीर सिंह, शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांनी टॉप ५ मध्ये आपले स्थान मिळवले आहेत. या यादीनुसार दीपिका मोस्ट व्हॅल्युएबल फिमेल सेलिब्रिटी ठरली आहे. मात्र, असे असले तरी २०१९ च्या तुलनेत ती दोन क्रमांकांनी खाली आली आहे.

केवळ दीपिका पादुकोणच नव्हे तर २०१९ च्या ब्रँड व्हॅल्यूच्या तुलनेत २०२० मध्ये अनेक प्रसिद्ध लोकांच्या ब्रँड व्हॅल्यूचे स्थान खाली आले आहे. महेंद्रसिंग धोनी २०१९ मध्ये नवव्या क्रमांकावर होता तर २०२० मध्ये तो अकराव्या क्रमांकावर आहे. तसेच सलमान सहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर आणि अमिताभ बच्चन आठव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर आले आहेत.

ब्रँड व्हॅल्यूच्या यादीत सर्वात जास्त नुकसान अभिनेत्री प्रियंका चोप्राला झाले आहे. प्रियंका २०१९ च्या ब्रँड व्हॅल्यूच्या यादीत तेराव्या क्रमांकावर होती. तर आता २०२० च्या यादीत ती सहा क्रमांकाने खाली आली असून आता ती एकोणिसाव्या क्रमांकावर आहे. प्रियंकाने टॉप २० च्या यादीत आपले स्थान मिळवले असले तरी ती कार्तिक आर्यनपेक्षा केवळ एका क्रमांकाने पुढे आहे. कार्तिकने पहिल्यांदाच २० वा क्रमांक मिळवत टॉप २० च्या यादीत सामिल झाला आहे.