अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास आणि तिचा पती निक जोनास (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या मुलीने या जगात पाऊल ठेवले आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. यासोबतच अभिनेत्री करिना कपूर-खान देखील लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. आता चाहत्यांना ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासकडून गोड बातमीची आस लागली आहे. चाहते प्रियांका आणि निकच्या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच प्रियांकाने एक मुलाखत दिली असून, ज्यामध्ये तिने तिचे आणि निकचे वैयक्तिक आयुष्य, लग्न, करिअर, बेबी प्लॅनिंग यावर खुलून चर्चा केली आहे. इतकचं नव्हे तर तिने या मुलाखतीमध्ये चक्क तिला किती मुलं हवी आहेत ? हेही उघडपणे सांगितले आहे.

प्रियांकाला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, फॅमिली प्लॅनिंगबाबत तू आणि निकने काय ठरवले आहे ? यावर बोलताना प्रियांका म्हणाली की, मला जितकी होतील तितकी मुले हवी आहेत. कदाचित एखादी क्रिकेट टीमच तयार होईल एवढी जवळपास मुले तिला निकसोबत हवी आहेत. मला लवकरच आई व्हायचे आहे असेही ती म्हणाली आहे. पुढे बोलताना प्रियांका म्हणाली की, ती जेव्हा निकसोबत असते तेव्हा तिला आयुष्य सर्वात जास्त आरामदायक आहे असं वाटतं. तिला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. त्यामुळे ती स्वतःला खूप भाग्यवान समजते की तिला निक जोनास सारखा चांगला साथीदार मिळाला.

दोघांच्या वयातील अंतर – या कपलमध्ये जवळपास १० वर्षांचे अंतर आहे. वयाच्या या फरकाबाबत तिला विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना प्रियांका म्हणाली की, ती निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. शिवाय तिच्या आाणि त्याच्या संस्कृतीमध्येही खूप मोठा फरक आहे. मात्र वय अथवा संस्कृती याचा त्यांच्या नात्यावर कधीच काहीही परिणाम झालेला नाही. प्रियांका आणि निक एखाद्या नॉर्मल कपलप्रमाणेच त्यांच्या आवडीनिवडी, सवयी एकमेंकांसोबत शेअर करतात असे ती त्यांच्या नात्याबाबतही भरभरुन बोलली. लॉकडाऊनच्या काळात आम्हाला एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवायला मिळाला. ज्यामुळे आम्हाला आमचे नाते अधिक नव्याने उलगडत गेले, असेही प्रियांकाने सांगितले.