सिद्धार्थ-मितालीला लागली हळद (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके कपल अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पुण्यात या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून सध्या त्यांची जोरदार लगीनघाई सुरु आहे. दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे समारंभ सुरु असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच सिद्धार्थ आणि मितालीचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.

सिद्धार्थने इन्स्टाग्राम हँडलवर त्याच्या हळदी समारंभाचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत सिद्धार्थ मितालीला किस करताना दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘अरं हळद लागली’. दुसऱ्या फोटोत दोघेही पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. लग्नाचे तेज दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत असून सिद्धार्थने या फोटोला ‘यल्लो फॅमिली’ असे कॅप्शन दिले आहे. तिसऱ्या फोटोत सिद्धार्थ प्रेमाने मितालीकडे पाहत असल्याचे दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले की, ‘यापेक्षा दुसऱ्या चांगल्या नजाराचा विचार करू शकत नाही’.

मितालीनेही हेच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, ‘आता आम्ही घोडा मैदानात दाखल झालो आहोत’. सिद्धार्थ आणि मितालीच्या या फोटोसोबत त्यांचा एक डान्स व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते दोघेही ‘वाजले की बारा’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली यांनी जवळपास तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१९ मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियावर ते दोघे नेहमी एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. या फोटोद्वारे ते दोघे कपल गोल्स असल्याचे दिसून येते.

मितालीने ‘उर्फी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील कस्तुरी या भूमिकेद्वारे मिताली प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तर दूसरीकडे सिद्धार्थनेही ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट तसेच ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तर सध्या तो सांग तू आहेस का या मालिकेत सिद्धार्थ ही भूमिका साकारत आहे.