सोनू सूद (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

मागील वर्षी कोरोना काळात अनेक लोकांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत म्हणून समोर आला होता. हजारो प्रवासी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी त्याने मदत केली होती. या कामाने सोनूने सर्व लोकांचे मन जिंकून घेतले होते. तर, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या या संकटकाळात तो लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. यादरम्यान अडचणीच्या वेळी लोकांची मदत करणे म्हणजे एखाद्या १०० कोटी चित्रपटाचा भाग होण्याच्या तुलनेत अधिक आनंदाचे असल्याचे सोनूने म्हटले आहे.

सोनूने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करत लिहिले की, ‘मध्यरात्री, असंख्य फोन केल्यावर जर तुम्ही गरजूंसाठी बेड किंवा ऑक्सिजन उपलब्ध करून देता आणि याद्वारे त्यांचे प्राण वाचवता हे तुमच्यासाठी अधिक समाधानकारक असते. हे तुम्हाला एखाद्या १०० कोटी चित्रपटाचा भाग होण्याच्या तुलनेत अधिक समाधान मिळवून देते. जेव्हा लोक बेडच्या प्रतीक्षेत रूग्णालयासमोर उभे असतात, तेव्हा आम्ही अजिबात झोपू शकत नाही’.

सोनूने यानंतर एक व्हिडिओ शेअर करत सर्व लोकांना मदत करू शकत नसल्याचे त्यांची माफी मागितली आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, क्षणाक्षणाला त्याला अनेक मेसेजेस येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक मेसेज पाहणे सोनूला आणि त्याच्या टीमला कठीण होत आहे. अशात सर्व लोकांना त्वरित मदत देऊ शकत नसल्याने त्याने सर्वांची माफी मागितली आहे. त्याने लिहिले की, आम्ही तुम्हा सर्वापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. जर यामध्ये उशीर झाला किंवा आमच्याकडून मदत राहून गेल्यास मला माफ करा. यासाठी क्षमस्व आहे.

काहीच दिवसापूर्वी सोनू सूदही कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे तो घरातच क्वारंटाईन होता. मात्र, यादरम्यानही तो घरीच बसून अनेकांची मदत करत राहिला. लोकांना रूग्णलयात बेड उपलब्ध करून देणे, रेमेडिसिवीर आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. आताही त्याचा मदतीचा ओघ सुरुच आहे. नुकतीच त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.