अभिनेता सोनू सूद (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. हा बॉलिवूड अभिनेता म्हणजे सोनू सूद. सोनूने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. सोनूचा कोवीड-१९ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याने सध्या स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.

सोनूने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. सोनूने पोस्ट शेअर करत लिहिलंय की, ‘कोरोना वायरल मोड आणि माझे स्पिरिट सुपर पॉझिटिव्ह आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, माझी कोवीड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मी सध्या स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. उलट आता माझ्याकडे सर्वाधिक वेळ राहील. तुमच्या सर्व अडचणी ठीक करण्याकरता मला हा वेळ जास्तीचा मिळेल. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला कोणतीही अडचण असली तरी मी तुमच्यासोबत नेहमी असेल..सोनू सूद’… अशा शब्दांमध्ये त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सोनूने कोरोनाचा डोस घेतला होता. त्याने पंजाबला हा डोस घेतला होता. त्यानंतर त्याने सोशल मीडियाद्वारे लोकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले होते. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, गोविंदा यांना करोनाची लागण झाली होती. आता सोनू सूदची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका बाजूला लसीकरण युद्धपातळीवर सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.