बॉलीवूडमधील काही कलाकारांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच चटका लावला. यातील काही कलाकारांचे मृत्यू तर अकाली झाले. अनेकांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलू शकलेले नाही. अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूमुळेही बॉलीवूडला मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूला सात महिने होऊनही त्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अभिनेत्याने त्याच्या शेवटच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले होते. पण ही फिल्म प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सुशांत सिंहप्रमाणेच बॉलीवूडमधील हे काही कलाकारही त्यांचा शेवटचा चित्रपट पडद्यावर पाहू शकले नाहीत. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्यांनी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.

अभिनेता सुशांत सिंहचा काल 21 जानेवारी रोजी वाढदिवस होता. मागील वर्षी 14 जून रोजी त्याच्या बांद्र्यातील घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सीबीआय करत आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ चित्रपटगृहे बंद असल्या कारणाने ओटीटीवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून त्याचे चाहते खूपच भावूक झाले. अभिनेत्री श्रीदेवी यांचा अचानक झालेला मृत्यूदेखील रहस्य बनून राहिला आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये दुबईत एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. बॉलीवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने शाहरुख खानची फिल्म ‘झिरो’मध्ये कॅमियो केले होते. पण प्रत्यक्षात पडद्यावर त्या त्यांचे कॅमियो पाहू शकल्या नाहीत.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती हिचा वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मृत्यू झाला होता. 5 एप्रिल 1993 रोजी या अभिनेत्रीचा अचानक मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी यातील गूढ अद्याप उकलू शकलेले नाही. 1992 मध्ये तीन हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीचा शेवटचा ‘शतरंज’ नावाचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर सुमारे नऊ महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. आपला हा चित्रपट पडद्यावर ती पाहू शकली नाही. तिच्या मृत्यूमुळेही बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता.

बॉलीवूडमधील आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाने बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. ही अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मुलगा प्रतीक याच्या जन्माच्या वेळी निर्माण झालेल्या काही गुंतागुंतीच्या कारणामुळे त्यांचे निधन झाले होते. त्यांची शेवटची ‘गलियों का बादशाह’ ही फिल्म त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ अडीच वर्षांनी म्हणजे 17 मार्च 1989 मध्ये प्रदर्शित झाली होती.

स्मिता पाटील यांच्यासोबत अनेक चित्रपटांतून भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू 6 जानेवारी 2017 मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने झाला. त्यावेळी ते सलमान खानसोबत ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचे शुटिंग करत होते. ही फिल्म जून 2017 मध्ये म्हणजे ओम पुरी यांच्या निधनानंतर पाच महिन्यांनी प्रदर्शित झाली. या चित्रपटातील आपली भूमिका प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्यापूर्वीच त्यांनी या जगातून ‘एक्झिट’ घेतली.

bollywood actors who passed away before their last film released