सुशांतचा मित्र गणेश हिवरकर याने सुशांत सिंह प्रकरणी अण्णा हजारेंशी केली चर्चा; अण्णांनी दिले हे आश्वासन / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

अभिनेता सुशांत सिंहच्या कथित आत्महत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांसह, ‘सीबीआय’, ‘ईडी’ तसेच ‘एनसीबी’ या चार तपास यंत्रणा करत असून घटनेला उद्या 14 जानेवारी रोजी सात महिने पूर्ण होत आहेत. मुंबई पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असल्याचे सांगत दोन महिन्यांनंतर हा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आला होता. पण अद्याप ‘सीबीआय’ही या प्रकऱणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेली नाही. सर्व शक्यता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यात येत असल्याचे ‘सीबीआय’ने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. आता सुशांतचा मित्र गणेश हिवरकर याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन या प्रकऱणासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

सुशांतच्या कथित आत्महत्याप्रकरणात सातत्याने नवनवीन दावे आणि खुलासे केले जात आहेत. या प्रकरणातून पुढे आलेल्या ड्रग्जच्या अँगलचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करत असून. सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर त्याच्या बँकखात्यातून रक्कम काढून घेतल्याच्या केलेल्या आरोपांचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे. तर हत्येचा संशय व्यक्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आला. आता घटनेला सात महिने होत आलेले असतानाही अद्याप सुशांतला न्याय न मिळाल्याने त्याच्या चाहत्यांसह त्चाचे कुटुंबीय आणि मित्र नाराज असून त्याला न्याय मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा त्याचा मित्र गणेश हिवरकर याने अण्णा हजारे यांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अण्णांनी या प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे त्याने सांगितले.

सोशल मीडियावर अण्णा हजारे यांच्यासोबतचा फोटो शेअर करून पोस्टमध्ये गणेश याने लिहिले की, तो गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कृपया कोणी त्याची मदत करू शकत असेल तर सांगा. त्यासोबत मराठीतून लिहिलेले पत्रही शेअर केले. त्यात त्याने म्हटले आहे, ‘मला एवढेच सांगायचेय की मी तीन विनंती करतो, ज्यात तुम्हाला योग्य वाटेल त्यात मदत करा. एक म्हणजे माध्यमांनी रोज 30 मिनिटे सुशांत प्रकरणाशी संबंधित बातम्या दाखवाव्यात. दुसरी म्हणजे ‘आरएसएस’सारख्या संघटनांनी आमची मदत करावी. तिसरी म्हणजे केंद्र सरकार आणि ‘सीबीआय’ला एक पत्र लिहिले जावे जेणेकरून ते या प्रकरणात लक्ष घालतील.’

‘सीबीआय’चे नवे पथक तयार?

दरम्यान, सोशल मीडियावर याच दरम्यान रिपब्लिक टीव्हीशी संबंधित प्रदीप भंडारी यांची पोस्ट समोर आली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले, ‘सीबीआय’चे नवे पथक तयार करण्यात येत आहे. जे यापुढचा तपास करेल. नवे पथक पुढील काही दिवसांत पुराव्यांच्या आधारावर तपास करेल. आताच सगळे काही संपलेले नाही, आशा सोडू नका.’

sushants friend ganesh hiwarkar met anna hazare and discussed