अभिनेता वैभव तत्ववादी (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटामुळे अभिनेता वैभव तत्ववादी सध्या फारच चर्चेत आहे. यामधील त्याच्या अभिनयाचे सध्या फारच कौतुक केले जात आहे. आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकणारा वैभव आपल्या फोटोद्वारेही चाहत्यांना आकर्षून घेत असतो. आपल्या स्टायलिश फोटोसोबत त्या फोटोच्या कॅप्शनद्वारेही तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. नुकतेच वैभवने त्याचा असाच एक कूल लूकमधील फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो खूपच आनंदी दिसून येत आहे.

वैभवने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याचा हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत असून एकदम आनंदी दिसून येत आहे. फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आपल्याकडे किती आहे यामुळे नाही तर आपण किती एन्जॉय करतो याद्वारे आपल्याला आनंद मिळत असतो. वैभवचा हा फोटो त्याच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत असून फोटोत त्याच्या चेहऱ्यावर आनंद खूपच भारी दिसत असल्याचे कमेंटद्वारे सांगत आहेत.

वैभव तत्ववादीचा जन्म २५ सप्टेंबर १९८८ रोजी नागपूर येथे झाला. नागपूर येथील सोमलवार हायस्कूलमधून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्यात आला. पुण्यामध्ये त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शाळेत आणि महाविद्यालयात असल्यापासूनच वैभवला अभिनयाची आवड होती. शिक्षण घेत असताना त्याने अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या. या स्पर्धांमधून त्याचा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला.

२०११ मध्ये आलेल्या ‘फक्त लढ म्हणा’ या चित्रपटातून वैभवने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर वैभवने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉट्सअप लग्न’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तसेच ‘बाजीराव मस्तानी’, ‘मणिकर्णिका’ यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते.

वैभवचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केले असून यामध्ये मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे. १९८०च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची कथा आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत समस्या दाखवली गेली आहे.