अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृती सेनॉन (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृती सेनॉन हे आगामी ‘भेडिया’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. निर्माते दिनेश विजन यांच्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या यशानंतर ते लवकरच ‘रुही’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यातच आता ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणाही त्यांनी केली आहे. भेडिया सिनेमाचा टीझर खूपच भीतीदायक वाटत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १४ एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे. वरुण-कृतीने या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कृती आणि वरुणने इन्स्टाग्रामवर या सिनेमाच्या टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. कृतीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलय की, ‘स्त्री’ और’ रुही’ को ‘भेडिया’ का प्रणाम, १४ एप्रिल २०२२ ला थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित..!अशा मजेशीर शब्दांमध्ये तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या टीझरमध्ये एक व्यक्ती पर्वतावरुन लांडग्याच्या आवाजात ओरडताना दिसतोय आणि पुढील सीनमध्ये तो व्यक्ती लांडगा झालेला दिसून येतोय. या सीनमध्ये पाठीमागे पोर्णिमेच्या रात्रीचा चंद्र दिसत आहे. त्यामुळे हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या टीझरच्या बॅकग्राऊंडला जे म्युझिक लावण्यात आले आहे ते सुद्धा खूपच भीतीदायक जाणवत आहे. थोडक्यात काय तर ‘भेडिया’ हा सिनेमा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी आता सज्ज झाला आहे.

‘भेडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्त्री’ आणि ‘बाला’ या सुपरहीट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजन यांनी ‘स्त्री’, ‘रुही’ आणि आता या ‘भेडिया’ ची निर्मिती केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर, अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रुही’ हा चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच त्यातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे तर ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता ‘भेडिया’ सिनेमातून वरुण-कृती स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.