चित्रपट कलाकारानी राजकारणात यावे का, हा वाद आता कालबाह्य झाला आहे, सतत कोणी ना कोणी कोणत्या तरी पक्षात प्रवेश करत असतोच.

लोकसभा निवडणुकीत ‘छोरा गंगा किनारेवाला’ विरुद्ध ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’

चित्रपट कलाकारांनी राजकारणात यावे का हा वाद आता कालबाह्य झाला आहे. त्याउलट कलाकारांचे एका ठारावीक वय व बॉलिवूडमधील यशानंतर उर्वरीत आयुष्यात राजकारण हादेखील त्यांच्या करिअरचाच एक भाग बनत चालला आहे. सतत कोणी ना कोणी कलाकार कोणत्या तरी पक्षात प्रवेश करत असतोच. अशाच वेळी फिल्मस्टारच्या  सर्वाधिक गाजलेल्या  निवडणुकीवर ‘फोकस’ टाकायला हवाच. आणि ही निवडणूक आहे अमिताभ बच्चनची!

आपले फिल्मी करिअर उत्तम ‘उंची’वर असतानाच आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी अमिताभने १९८४ साली राजकारणात पाऊल टाकले होते. राजकारणात येताच  उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मतदारसंघांतून इंदिरा काँग्रेसचा उमेदवार म्हणून  समाजवादी पक्षाचे तगडे उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या विरोधात  लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे त्यांनी निश्चित केले.

ही गोष्ट संपूर्ण देशातील मीडिया, चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांचे लक्ष वेधणारी ठरली हे वेगळे सांगायला नकोच. मात्र, बॉलिवूडचा महानायक राजकीय मैदानात आपल्या विरुद्ध असला तरी, बहुगुणांसारखा कसलेला  राजकारणी अजिबात विचलित झाला नाही. पण, ही निवडणूक आव्हानात्मक आहे याची त्यांना कल्पना आली.

कारण बॉलिवूडच्या महानायकाच्या प्रचार फेरीला, भाषणांना प्रचंड गर्दी असायची. 

पडद्यावरचा सुपरस्टार इतका सहजपणे दर्शन घडवतोय तर हे होणारच होते. आता रंगतदार प्रचारात अमिताभच्या सिनेमाचे गाणे आले नसते तरच नवल. ”छोरा गंगा किनारेवाला अशी अमिताभच्या बाजूने आघाडी उघडताच,  समाजवादी पक्षाच्या वतीने तेवढ्याच समर्थपणे उत्तर दिले होते, ”मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है”.

अमिताभच्या गाण्यानेच त्याला उत्तर दिले गेले म्हणून या निवडणुकीची फारच चर्चा रंगली होती. अमिताभचे दिसणे विरुद्ध बहुगुणा यांचे धोरण अशी ही निवडणूक. अमिताभ मोठ्या मताधिक्याने जिंकलाही आणि तो लोकसभा सभागृहात पोहोचला.

ही एक प्रकारची ऐतिहासिक निवडणूक ठरली. त्याच निवडणूकीत वायव्य मुंबईतून सुनील दत्त तर दक्षिण चेन्नईतून वैजयंतीमालाही विजयी झाले. तत्पूर्वी आणि तद्नंतरही देशातील हिंदी तसेच मराठीसह अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. काही पराभूतही झाले. पण ‘फिल्म स्टारची गाजलेली निवडणूक’ असे म्हणताच अमिताभ बच्चनने जिंकलेली निवडणूक सर्वप्रथम लक्षात येते इतकी ती सॉलिड गाजली होती…

  • स्पॉटबॉय