आपल्या मित्रमंडळींच्या सांगण्यावरुन त्यांनी सिनेमात नकारार्थी रोल स्वीकारण्यास सुरूवात केली. १९८७ मध्ये आलेल्या 'मिस्टर इंडिया' ने अमरीश पुरींना नकारार्थी भूमिकांचा बादशहा बनले होते.

‘मोगँबो खुश हुआ’ हा डायलॉग ऐकला की आपल्या नजरेसमोर अमरीश पुरी यांचा रागीट आणि क्रूर चेहरा आल्यावाचून राहत नाही. ८० च्या दशकातले वजनदार, दमदार आणि निष्ठूर भूमिका निभावणारे सर्वोत्कृष्ट  व्हिलन म्हणून परिचित असलेल्या अमरीश पुरी यांचा मंगळवारी जन्मदिवस आहे. जर ते आज जिवंत असते तर ते ८९ वर्षांचे झाले असते. आपल्या करिअरच्या शेवटी त्यांनी विनोदी भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली होती.

पंजाबमधील नवाशहरमध्ये अमरीश पुरी यांचा जन्म झाला. त्याचा मोठा भाऊ आधीपासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होता. भावाच्या सांगण्यावरून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मुंबई गाठली. पण ज्या ज्या वेळी त्यांनी ऑडिशन दिले, त्या त्या वेळी त्यांना नाकारण्यात आले. याचे कारण असे सांगण्यात आले की, त्यांचा चेहरा सिनेमात हिरो बनण्याच्या लायकीचा अजिबात नाही. हे शब्द कानावर पडताच अमरीश पुरी यांना खूप दु:ख झाले होते. त्यामुळे त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय देखील घेतला होता. पण आपल्या मित्रमंडळींच्या सांगण्यावरुन त्यांनी सिनेमात नकारार्थी रोल स्वीकारण्यास सुरूवात केली.

१९७० मध्ये आलेल्या ‘प्रेम पुजारी’ पासून त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा सुरू केला. त्यांनी आजवर ३५० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी निभावलेले बहुतांश रोल हे निगेटिव्हच होते. १९८० मध्ये आलेल्या ‘हम पांच’मधील भूमिकेमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर आलेल्या विधाता आणि हिरो या सिनेमातील त्यांच्या दमदार नकारार्थी भूमिकेमुळे त्यांच्यासाठी यशाचे सर्व दरवाजे खुले झाले हाेते.

१९८७ मध्ये आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ने अमरीश पुरींना नकारार्थी भूमिकांचा बादशहा बनवले होते. प्रसिद्धी आणि यश याच्यामुळे त्यांनी आपल्या मानधनामध्ये वाढ केली होती. यामुळे त्यांना बरेच चांगले सिनेमे सोडावे लागले होते. एका इंटरव्यूमध्ये त्यांनी असे देखील सांगितले होते की, लोक मला पाहण्यासाठी सिनेमागृहामध्ये येतात. तेव्हा मी माझ्या मानधनात वाढ केली हे इतके चुकीचे नसावे.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, चाची ४२०, घातक, परदेस, हलचल हे काही त्यांचे पॉझिटिव्ह कॅरॅक्टर भूमिका निभावलेल्या सिनेमांची यादी आहे.