टॉपच्या सेलिब्रिटींच्या सगळ्याच गोष्टी भारी असतात. ते स्वतः तर प्रचंड 'चलनी नाणे' असतातच, पण त्याबरोबरच त्यांच्या आजूबाजूचीही माणसेही आपोआपच महत्त्वाची होतात.

टॉपच्या सेलिब्रिटींच्या सगळ्याच गोष्टी भारी असतात. ते स्वतः  तर खणखणीत असे ‘चलनी नाणे’ असतातच, पण त्याबरोबरच त्यांच्या सोबतची, त्यांच्या आजूबाजूची माणसं,  त्यांनाही आपोआपच प्रसिध्दीचा मुलामा चढत असतो. आपल्या माधुरी दीक्षितचेच बघा. आता ती किती मोठी सुपरस्टार आहे हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. ते तर झालेच पण, अगदी तिचा सेक्रेटरी रिक्कू अर्थात राकेश नाथही त्यांच्या सोबत राहता राहता स्टार झाला. ऐंशीच्या दशकातली ही गोष्ट. रिक्कू आधी  बिंदिया गोस्वामीचा सेक्रेटरी होता. बिंदियाने अभिनयातून संन्यास घेतल्याने रिक्कू पुढे अभिनेत्यांच्या शोधात होताच. त्याला कलाकार हवे होतेच. त्याला मग एकाच वेळेस अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि शिल्पा शिरोडकर (मग नम्रता शिरोडकरही) मिळाले.

अनिल कपूरच्या चित्रपटांची निवड अनेकदा त्याचा मोठा भाऊ बोनी कपूर पाहायचा आणि तारखांची डायरी रिक्कू सांभाळायचा. माधुरीच्या बाबतीत मात्र रिक्कूच सबकुछ होता. तोच सगळे हॅन्डल करायचा.

एन. चंद्रा यांच्या ‘तेजाब’साठी अनिल कपूर साईन होता आणि अनिलच्या तारखांनुसार शूटिंग करायचे होते तेव्हा रिक्कूने माधुरीचे नाव पुढे केले. तत्पूर्वी चंद्रा यांनी माधुरीला एका डबिंग थिएटरमध्ये पाहिले होते. अनिल कपूर आणि माधुरी अशा दोघांनाही मग रिक्कूने हिफाजत, राम लखन, परिंदा, बेटा, किशन कन्हैया, राजकुमार, जीवन एक संघर्ष  वगैरे चित्रपटांसाठी जणू ‘पॅकेज डील’ केले. एखाद्या जोडीच्या फिल्मने खणखणीत यश प्राप्त केले की त्याच जोडीला साईन करण्यात निर्माते उत्सुक असतात हे रिक्कूच्याही पथ्यावर पडले. त्या काळात एखाद्या स्टुडिओत रिक्कू लांबून जरी दिसला की लक्षात येई की येथे माधुरी शूटिंग करीत असणार.

सुशांत सिंहच्या प्रकरणावर अमित शहा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सीबीआय चौकशीत सर्वकाही स्पष्ट होणार’ 

माधुरीचा अनेक सिनेपत्रकारांशी थेट संवाद असे, तो तिचा चांगला गुण. तरी रिक्कू म्हणायचा ‘मुझे बोलते तो खाने पे बुलाता’. गंमत म्हणजे, रिक्कू, मॅडम माधुरीची भरपूर काळजी घेताना दिसे. आणि हे एवढ्यावरच थांबले नाही तर रिक्कूच्या पत्नी रिमा राकेशनाथ यांनी माधुरी दीक्षितच्या चित्रपटांचे संवाद आणि पटकथा लेखन सुरु केले.

माधुरीची भूमिका असलेल्या ‘मोहब्बत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रिमा राकेशनाथ यांनीच केले आहे. ती एकूणच वेगळी स्टोरी आहे. पण राकेशनाथ ‘स्टार’ सेक्रेटरी असल्यानेच हे सगळे घडले. कालांतराने चित्रपटसृष्टीत सेक्रेटरी पद्धत गेली आणि एखाद्या स्टारची एक स्वतंत्र टीम सगळे काम पाहू लागली. मग रिक्कू मागे पडत गेला.

माधुरीच्या लग्नाची पहिली बातमी मीडियात कोणी दिली माहितीये? अगदी तारीखवार सांगतो, ५ नोव्हेंबर १९९९ च्या रात्री दहा वाजता ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने बातमी देत म्हटलं की, लाखो दिलो की धडकन माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केल्याचे तिचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथ यांनी ‘आजतक’शी बोलताना सांगितले. (त्या काळात फक्त रात्री दहा वाजता आज तक असे).

माधुरीच्या ग्लॅमरस यशस्वी कारकिर्दीत तिचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथचे महत्वाचे स्थान लक्षात आले ना? ‘स्टार सेक्रेटरी’ म्हणतात ते हेच तर असते. या फोटोतही रिक्कू राकेशनाथ माधुरीची विशेष काळजी घेताना दिसतोय बघा.

  • स्पॉटबॉय