तवायफ या हिंदी चित्रपटात पूनम धिल्लाॅन आणि दीपक पराशरसोबत आशालता

आशालता वाबगावकर हे मराठी रंगभूमीवरील यशस्वी नाव. त्यांचा नाटकांत खूप मोठा सहभाग. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर भूमिका साकारल्या. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीत लहान मोठ्या भूमिका साकारताना तिकडच्या स्टार्सचे येणारे अनेक प्रकारचे अनुभव त्या खूप रंगवून/खुलवून सांगत.

‘नमक हलाल’च्या वेळी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर अतिशय आदराने त्यांच्याशी वागत. अगदी पहिल्या भेटीतच शशी कपूरने जंटलमनपणा दाखवला याचे त्याना कायमच कौतुक वाटे. नटराज स्टुडिओत ‘अपने पराये’च्या शूटिंगमध्ये त्या बिझी असतानाच त्यांना समजले की शेजारच्याच सेठ स्टुडिओत राजेश खन्नाचे शूटिंग सुरू आहे, तो त्यांचा अतिशय आवडता अभिनेता. सेठ स्टुडिओच्या बाहेरच्या झाडावर चक्क त्याचे फॅन्स चढलेले पाहून त्या सुखावल्या. पण मग प्रत्यक्ष सेटवर त्याने त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने त्या निराश झाल्या. काही काळाने त्याच राजेश खन्नाने चेन्नईत ‘दिल ए नादान’च्या सेटवर त्यांची स्वतः पुढे होऊन दखल घेतल्याने त्या सुखावल्या आणि मग ते शूटिंग सत्र त्यांनी मोठ्या प्रमाणावर एन्जॉय केले.

‘आशा ज्योती’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजेश खन्ना, रेखा आणि रिना रॉय यांच्यासोबतच्या आठवणी खूप. ‘गुंतता ह्रदय हे’ या नाटकावरुन मराठीत ‘महानंदा’ चित्रपट बनला तेव्हा त्या ‘तवायफ’ या हिंदी चित्रपटात बिझी होत्या. त्यामुळे त्यांना त्यात भूमिका साकारता आली नाही. पण त्याच नाटकावरुन ‘महानंदा’ या नावाचाच चित्रपट निर्माण झाला तेव्हा त्यांना संधी तर मिळालीच. पण आपल्याच गोव्यात शूटिंग असल्याने त्या खुलल्या.

मौशमी चटर्जी, फारुख शेखसोबत तेव्हा खूप गप्पा मारल्या असे त्या सांगत. महत्वाचे म्हणजे स्मिता पाटीलशी आशालताचे अतिशय जवळचे संबंध होते. ‘उंबरठा’ आणि इतर चित्रपटांत त्यांनी एकत्र भूमिका साकारली. दुर्दैवाने स्मिता पाटीलचे अनपेक्षितपणे निधन झाले. १३ डिसेंबर १९८६ रोजी आशालताच जसलोक इस्पितळात स्मिता पाटीलला सावरत होत्या. पण दुर्दैवाने त्यांच्या समोरच स्मिता पाटीलचे निधन झाल्याने आशालता कायमच्या हेलावल्या.

आशालता यांच्याकडे अशा अगणित आठवणी, अनुभव असत. गप्पिष्ट स्वभावामुळे त्यांचा अनेकांशी पटकन संवाद जुळे आणि त्याच गुणांमुळे त्या गोष्टी इतरांनाही भरभरून सांगत.

  • स्पॉटबॉय