रेखाने लेख टंडन दिग्दर्शित 'अगर तुम न होते' (१९८३) या चित्रपटासाठी गायले.

रेखा म्हणजे काहीही अशक्य नाही, रेखा म्हणजे चमत्कार, रेखा म्हणजे अष्टपैलूत्व असे एकदा तुम्ही मान्य केले की रेखाबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी जाणून घेण्यातील तुमची उत्सुकता आपोआपच वाढेल आणि रेखाच्या पन्नास वर्षांच्या रुपेरी वाटचालीत अशा काही अनपेक्षित गोष्टी तिची खासियत राहिल्यात. रेखा चक्क गाणेही गायलीये.

आजच्या डिजिटल युगात कोणीही कसेही केव्हाही आणि काहीही गातंय ते ऐकू नका आणि पाहूदेखील नका. पण ऐंशीच्या दशकापर्यंत एखाद्या स्टारने गाणे हे अपवादात्मक होते. त्यावेळी रेखा गायली. कोणते गाणे गायली ते नक्कीच सांगतोय. तोपर्यंत अमिताभ बच्चन गायक म्हणूनही ओळखला जाऊ लागला म्हणूनच रेखाला सूर सापडला का? तिचा आवाज लागला का?

राकेशकुमार दिग्दर्शित ‘मिस्टर नटवरलाल’साठी (१९७९) अमिताभ मेरे पास आयो मेरे दोस्तो हे गाणे गायला आणि हे गाणे हिट झाल्याने अमिताभ सिलसिला, पुकार इत्यादी चित्रपटासाठी गायला. आता तो जे काही करतोय ते आपणही करायला काय हरकत आहे असा स्फूर्तिदायक प्रश्न नक्कीच पडू शकतो. आणि चांगल्या यशस्वी गोष्टीचा आदर्श ठेवण्यात चूक काहीही नाही.

रेखाने लेख टंडन दिग्दर्शित ‘अगर तुम न होते’ (१९८३) या चित्रपटासाठी गायले. गुलशन बावरा याने लिहिलेल्या गाण्याला राहुल देव बर्मनचे संगीत आहे. या गाण्याचा मुखडा आहे, कल तो संडे की छुट्टी… रेखा आणि शैलेन्द्रसिंग यांनी हे गाणे गायले. पडद्यावर हे गाणे राज बब्बर आणि रेखावर आहे.

रेखाला कायमच लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले. त्या एक्प्रेशन मेलडी उत्तम जाणतात. पडद्यावर गाणे पाहताना खुद्द रेखाच ते गाते आहे असे वाटते हे तर मंगेशकर भगिनींचे कौशल्य आहे. पण आपणही गायला काय बरे हरकत आहे, असा सकारात्मक विचार रेखाच्या मनात येऊ शकतो.

व्यावसायिक कलाकारांना कारकीर्द साकारताना लहान मोठ्या अनेक गोष्टी जमायला हव्यात हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. रेखाने तेच तर केले आणि ती स्वतःसाठी गायली. आणि तेदेखील अतिशय हसतखेळत गायली. अगदी पद्यातच गायला हवे असे काही नसतेच म्हणा. रेखा गायलीये हीच मोठी बातमी.

  • स्पॉटबॉय