मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपण म्हणतो, तसेच अनेक गुणी कलाकारांचे पाय बालकलाकार म्हणून दिसतात. उर्मिला मातोंडकरनेही अगदी तसेच केले बघा.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपण म्हणतो, तसेच अनेक  गुणी कलाकारांचे पाय बालकलाकार म्हणून दिसतात. उर्मिला मातोंडकरनेही अगदी तसेच केले बघा. तिने डॉ. श्रीराम लागू दिग्दर्शित आणि अभिनित ‘झाकोळ’ ( १९८०) या मराठी चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका स्वीकारली.

पहिल्याच चित्रपटात तनुजा आणि सरला येवलेकर यांच्यासोबत भूमिका साकारायची संधी मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सेटवर तनुजा आपली मुलगी काजोलला घेऊन येई आणि बालवयातील उर्मिला आणि काजोल यांचे छान जमे. पण काजोल तेव्हा इंग्रजी माध्यमात शिकत होती, तर उर्मिला मराठी माध्यमात. म्हणूनच तर तिचे मराठी आजही चांगले आहे.

उर्मिलाला शेखर कपूर दिग्दर्शित ‘मासूम’मध्ये (१९८३) नसिरुद्दीन शहा व शबाना आझमी अशा कसलेल्या कलाकारांसोबत संधी मिळाली. जुगल हंसराज यात बालकलाकार होता. याशिवाय उर्मिलाने श्याम बेनेगल दिग्दर्शित  ‘कलयुग’, के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘सूर संगम’, राहुल रवैल दिग्दर्शित ‘डकैत’ अशा आणखी काही चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली. ते करताना आपल्या शिक्षण आणि वाचन याकडे तिचे अगदी पूर्ण लक्ष होते. तिच्या घरचेच वातावरण तसे होते. तिचे आई बाबा त्याकडे विशेष लक्ष ठेवून होते.

उर्मिलाला त्यांनी त्या काळात फिल्मी होऊ दिले नाही. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण, अनेक बालकलाकाराना याचे भान राहत नाही आणि फारच थोडे बालकलाकार मोठेपणीही यशस्वी  स्टार होतात. उर्मिलाने बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारलीये, म्हणजेच तिने चित्रपट निवडीच्या बाबतीत उगाच घाई केली नाही आणि आपल्या चित्रपटांची  भारंभार संख्याही वाढवली नाही.

अर्थात, नायिका म्हणून तिने वाटचाल सुरु करताना आपल्या वाटेला आलेल्या अडथळ्यांच्या शर्यतीत तिने आपली प्रतिभा आणि मेहनत या गुणांवर यश प्राप्त केले ही वेगळी कलरफुल स्टोरी आहे.

  • स्पॉटबॉय