Singer lucky ali is all well : नफिसाने दिलेल्या माहितीनुसार लकी अली सहकुटुंब बंगळुरू येथील फार्म हाऊसवर मजेत आहे.

गेल्या काही दिवसांत गुणी गायक लकी अली याच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. त्या बातम्या चुकीच्या आहेत हे स्पष्ट करण्यासाठी लकी अलीने स्वत: एक पोस्ट शेअर केली आहे. कोरोनाच्या या अतिशय दुर्दैवी काळात अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या अशा अफवा पसरवणं खरोखर निंदनीय आहे. अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिच्या निधनाची अफवाही अशीच पसरली होती. त्यानंतर आता गायक लकी अलीबाबत हेच घडले आहे. त्याच्या निधनाची बातमी खोटी असल्याचे त्याची मैत्रीण नफिसा हिने सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. त्याच पोस्टवर लकी अलीने रिऍक्ट केले आहे. आणि स्वत:सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपण खुशाल असल्याचे कळवले आहे.

इन्स्टाग्रामच्या त्याच्या अकाऊंटवर स्टोरीमध्ये त्याने हे अपडेट दिलं आहे. तो म्हणालाय, सगळ्यांना हॅलो.. मी स्वस्थ आहे आणि घरीच आराम करत आहे. माझ्या मृत्युच्या बातम्यांसंदर्भात मला हे सांगायचं आहे की मी जिवंत आहे, स्वस्थ आहे आणि घरी अगदी शांतपणे आराम करत आहे. मला आशा आहे की तुम्ही सगळेही नीट असाल. घरीच राहा आणि सुरक्षित राहा. या कठीण काळात आपल्याला तारून न्यावं यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे.

लकी अलीच्या निधनाचे वृत्त खोटं असल्याचं सर्वात आधी नफिसा अली हिने कळवलं होतं. ती म्हणाली होती की, लकी अलीला कोरोनाची लागण झालेली नाही. मंगळवारी एक ट्वीट करुन तिने हे अपडेट दिलं होतं की आज दुपारीच आमचं बोलणं झालं आहे. लकी त्याच्या कुटुंबासोबत त्यांच्या फार्म हाऊसवर आहे. त्याला कोविड झालेला नाही. तो अगदी नीट आहे.

नफिसाने दिलेल्या माहितीनुसार लकी अली सहकुटुंब बंगळुरू येथील फार्म हाऊसवर मजेत आहे. तो अगदी ठीक आहेच आणि त्याच्या शरीरात ऍन्टीबॉडीजही निर्माण झालेल्या आहेत. लकी अली सध्या त्याच्या आगामी कॉन्सर्टच्या तयारीत बिझी आहे. हे कॉन्सर्ट शक्यतो व्हर्चुअल असणार आहे. लकी अलीच्या निधनाच्या बातम्या यायला लागताच त्याचे चाहते निराश झाले होते आणि सोशल मीडियावर आपल्या लाडक्या गायकाला श्रद्धांजली वाहात पोस्ट शेअर करू लागले होते. मंगळवार संध्याकाळपासून ही बातमी व्हायरल झाली होती.

लकी अलीने ओ सनम मोहब्बत की कसम, तेरे मेरे साथ, क्या ऐसा ही होता है प्यार अशी सुपरहिट गाणी गायलेली आहेत. कहो ना प्यार हैं मधलं एक पल अका जीना आणि तमाशा या सिनेमातलं सफरनामा हे गाणं लकी आलीनेच गायलं आहे. गेल्या वर्षी लकीचा ओ सनम हे गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.