Sunil Dutt Real Name : सुनील दत्त यांचं २५ मे २००५ रोजी हृदयविकारामुळे निधन झाले. ’मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चाहत्यांना शेवटचे दर्शन दिले होते.

सुनील दत्त यांचं खरं नाव बलराज रघुनाथ दत्त होतं. सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी स्वत:चं नाव बदललं होतं. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलेल्या सुनील दत्त यांनी जवळपास चार दशकं प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. सुनील दत्त आता या जगात नाहीत मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांच्य़ा आठवणींमध्ये ते आजही चिरतरूण आहेत. सुनील दत्त यांचा जन्म पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात झाला होता. मात्र फाळणीच्या काळात त्यांच्या कुटुंबाने भारतात स्थलांतर केलं. सुनील दत्त पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळेच शिक्षणासाठी ते मुंबईला गेले असताना त्यांना बसमध्ये कंडक्टरची नोकरी करावी लागली होती.

सुनील दत्त यांचा आवाज खूप भरदार होता. आणि ते कॉलेजमध्ये असताना नाटकांत काम करू लागले होते. एकदा सुनील यांच्या नाटकाचा प्रयोग बघायला रेडिओचे प्रोग्रॅमिंग हेड आले होते. त्यांना सुनील यांचा आवाज पसंत पडला आणि त्यांनी सुनील यांना रेडिओमध्ये निवेदकाची नोकरी ऑफर केली. वेळ न दवडता सुनील यांनी ती संधी स्वीकारली. या कामासाठी त्यांना दरमहा २५ रुपये मिळत असत. रेडिओत काम करत असताना त्यांनी अभिनेत्री नर्गिस यांची एकदा मुलाखतही घेतली होती.

त्यांनी बॉलीवूड करिअरची सुरुवात १९५५ साली ’रेल्वे प्लॅटफॉर्म’ या सिनेमाद्वारे केली होती मात्र ’मदर इंडिया’ या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. यानंतर त्यांनी मुझे जीने दो नावाचा एक सिनेमा केला होता, त्यात त्यांनी एका डाकूची भूमिका केली होती. या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.

कॅन्सरचा आजार दुर्धर ठरुन त्यांची पत्नी खासदार नर्गिस दत्त यांचे निधन झाले. त्यानंतर सुनील दत्त अतिशय खचून गेले होते. त्यानंतर स्वत:ल सावरत त्यांनीही राजकारनात प्रवेश केला. २००४ ते २००५ याकाळात ते क्रीडा आणि युवा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. १९६८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

सुनील दत्त यांचं २५ मे २००५ रोजी हृदयविकारामुळे निधन झाले. ’मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चाहत्यांना शेवटचे दर्शन दिले होते.