Dilip Kumar Original name : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्या नामांतरात एक मोठा रंजक किस्सा दडलेला आहे. हा किस्सा दिलीपकुमार यांना वाटणाऱ्या एका भीतीशी संबंधित आहे.

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्या नामांतरात एक मोठा रंजक किस्सा दडलेला आहे. हा किस्सा दिलीपकुमार यांना वाटणाऱ्या एका भीतीशी संबंधित आहे. हा किस्सा ठाऊक असलेले त्यांचे जुने-जाणते चाहतेदेखील ही गोष्ट ऐकून मजेने हसतात. दिलीप कुमार हिंदी सिनेविश्वाच्या सर्वाधिक प्रभावी कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्यामुळे अभिनयाची व्याख्याच बदलून गेली. जगभरातले त्यांचे चाहते त्यांना ’ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखत असत. अभिनयाच्या सादरीकरणात एक ठहराव, विशिष्ट खोली असलेले त्यांच्या पिढीतले ते पहिले अभिनेता होत. बॉलीवूडचा ट्रॅजिडी किंग या उपाधीखेरीज एक मेथड ऍक्टर अशीही त्यांची ओळख होती. या कलेत त्यांनी नैपुण्य मिळवलं होतं. अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी दिलीप कुमार यांचे सगळे सिनेमे बघितले तर त्यांना कोणत्याही ऍक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

दिलीप कुमार अतिशय योगायोगाने फिल्मी दुनियेत दाखल झाले. एका मित्रासोबत त्यांनी अगदी सहज बॉम्बे टॉकीजमध्ये पाऊल ठेवलं होतं आणि अभिनेत्री देविका राणी यांची नजर दिलीप कुमार यांच्यावर पडली. दिलीप कुमार यांना फिल्म क्षेत्रात आणण्याचं श्रेय देविका राणी यांचंच आहे. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की त्यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान आहे. सिनेमा क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी स्वत:चं नाव दिलीप कुमार असं ठेवलं. या नामांतराचा किस्सा मोठा रंजक आहे.

देविका राणी यांनी १९४४ मध्ये ज्वार भाटा या सिनेमाद्वारे युसूफ खान यांना दिलीप कुमार या नावानिशी बॉलीवूडसमोर सादर केलं.  दिलीप कुमार यांनी आपल्या नामांतराचा हा किस्सा त्यांच्या आत्मचरित्रात, ’दिलीप कुमार : द सबस्टन्स ऍन्ड द शॅडो’ या पुस्तकात अगदी मोकळेपणानं लिहिला आहे. दिलीप कुमार यांनी स्वत:च्या नामांतराची आठवण शेअर करताना लिहिलंय, ’देविका मला म्हणाली- युसूफ, मी तुला एक अभिनेता म्हणून सिनेमाद्वारे पुढे आणण्याच्या विचारात आहे. आणि म्हणूनच मला वाटतंय की तू तुझं पडद्यावरचं नाव बद्ललंस तर ते फार बरं होईल. एखादं असं नाव ज्यामुळे तू ओळखला जाशील आणि प्रेक्षकांना तुला लक्षात ठेवणं सोपं जाईल. असं नाव ज्यामुळे तुझी पडद्यावरची रोमॅंटिक प्रतिमा ओळखली जाईल. मला वाटतंय की दिलीप कुमार हे नाव अतिशय योग्य आहे तुझ्यासाठी. तुझ्याविषयी मी विचार करत होते तेव्हा माझ्या मनात हे नाव आलं. तुला कसं वाटतंय हे नाव?

दिलीप कुमार यांना ते नाव पसंत पडलं आणि त्यांनी याच नावाने त्यांच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. आणि अशा तऱ्हेने युसूफ खानचा दिलीप कुमार झाला. आता पाहूया दिलीप कुमार यांना कसली भीती वाटत होती? त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं- ’ माझ्या वडिलांना फिल्म क्षेत्र मुळीच पसंत नव्हतं. त्यांचे एक खूप जवळचे मित्र होते, त्यांचं नाव होतं- लाला बन्सी शेरनाथ. त्यांचा मुलगा पृथ्वीराज कपूर सिनेमात अभिनय करत असे. माझे वडील नेहेमीच त्यांच्याकडे तक्रार करत असत की तू तुझ्या मुलाला स्वत:चं असं वाटोळं का करू देतो आहेस? तो किती तगडा तरूण मुलगा आहे आणि पाहा, काय करतोय ते?’

दिलीप कुमार यांनी पुढे सांगितलं होतं, ’मी सिनेमात आलॊ तेव्हा मला खूप भीती वाटली होती की वडिलांना हे समजलं तर ते खूपच चिडतील. माझ्या समोर नावांचे तीन पर्याय ठेवले गेले होते. युसूफ खान, दिलीप कुमार आणि वासुदेव. मी म्हणालो कृपा करून युसूफ खान ठेवू नका, बाकी तुम्हाला योग्य वाटेल ते ठेवा. यानंतर दोन-तीन महिन्यांनी एका पेपरमध्ये सिनेमाची जाहिरात आली तेव्हा मला समजलं की माझं नाव दिलीप कुमार ठेवलं गेलं आहे.’