बुलबल हा भयपट आहे, पण आपण भारतीय प्रेक्षकांवर गेली कित्येक दशकं ज्या पद्धतीच्या भयपटांचा प्रभाव आहे त्यापैकी हा एक नव्हे. याची मांडणी, रचना, कथा रचना ही टिपिकल पद्धतीपेक्षा खूप वेगळी आहे. कथा बीज आणि त्याची मांडणी, दिग्दर्शन या बाबींआधी हा सिनेमा खरंतर भयपटांमध्ये केलेल्या सशक्त प्रयोगाचं उत्तम मानक आहे.

बुलबुल ही १९ व्या शतकातल्या बंगालची कथा. बंगलात असणारी जहागिरी, त्यात असणारे वयस्कर पुरुष आणि कुटुंब पद्धतीची रचना, बाल विवाह आणि अर्थात गावोगावी असणाऱ्या कथा, भयकथा हा कथेचा मूळ आधार आहे. चित्रपटाची नायिका अशाच एका मोठ्या वयस्कर जहागीरदाराची बायको म्हणून त्या गावात येते आणि हळूहळू गाव आणि त्यांच्या कथा यात रमते. तिथून ती मोठी झाल्यानंतर घडणाऱ्या घटना म्हणजे बुलबुल होय.

सुंदर स्त्रीच्या मनात काय चाललेलं असतं हे कळलं तर काय होऊ शकतं आणि नाही कळलं तरीही काय होतं याचं हे चित्रण आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा सशक्त आहेच. अंविता दत्तचा पहिला सिनेमा म्हणून त्यात उणीवा काढता येत नाहीत. पण सिनेमा हा कथेइतकाच त्यांच्या रुपकांचा आहे. प्रेक्षक म्हणून तुम्ही कथेपेक्षा रुपकांकडे जास्त स्थिर केले जाता. हा मुद्दा जितका धन आहे तितकाच ऋण सुद्धा. लेखक हाच दिग्दर्शक असल्याचा एक वेगळा फायदा सिनेमाला असतो. तो काय याचं उत्तर हा सिनेमा होय.

दिग्दर्शिकेवर रविंद्रनाथांच्या चोखेर बाली, अब्रार अल्विंच्या साहेब बीबी और गुलाम तसेच चारुलताचांही उघड प्रभाव दिसतो. पण या सगळ्यामुळेच (कदाचित) सिनेमात उभा केलेला बंगाल अधिक सशक्त आहे.

सिनेमाची कास्ट आणि त्यांचा अभिनय ही सर्वात जमेची बाजू आहेच. राहुल बोस, पाऊली , अविनाश तिवारी आणि अर्थातच तृप्ती धिमरी यांचा अभिनय उत्तम आहे. पण अभिनया इतकंच सिनेमाला दिलेलं संगीत आणि छायाचित्रण उजवं आहे. १९ व्या शतकामधलं बंगाल बऱ्याच काळानंतर कुणीतरी सशक्त उभं केलंय. अमित त्रिवेदी हा जादू असलेल्या संगीतकार आहे. त्याने या आधीही याच काळातल बंगाल लुटेरामध्ये उभा केला होता. यावेळी देखील त्याची जादू चालली आहे.

हा सिनेमा भयकथा म्हणून वेगळा आहेच. पण फक्त सिनेमा म्हणून विचार केला तरीही तो वेगळा आहे. एक उत्तम जुळून आलेल्या पाककृतीसारखी त्याची चव आहे. ट्रेलर ते सिनेमा ही चव प्रेक्षक म्हणून आपल्या मनात रेंगाळत राहते. हा सिनेमा बघावाच असा आहे. आपण व्यावसायिक सिनेमा म्हणून अधिक समंजस आणि प्रगल्भ होत चाललो आहोत का? बहुदा हो. हा ‘ हो ‘ अजून घट्ट करणारा सिनेमा म्हणजे बुलबुल होय.

अनिरुद्ध प्रभू

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *