आरती कादव या दिग्दर्शिकेचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि तिने विषय आणि सादरीकरणाच्या बाबतीत मोठी झेप घेतलेली तुम्हाला पाहायला मिळू शकते.

बुद्धीला आव्हान देणारी, विचार करण्यासाठी भाग पाडणारी, सादरीकरणात नाविन्य असलेली एखादी मूळ कलाकृती तुम्हाला पाहायला मिळाली तर?

तुम्ही म्हणाल असा योग तर फार कमी येतो. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, सोनी लाइव्ह, प्राइम इतके सारे प्लॅटफॉर्म्स असूनही एखादा हटके सिनेमा पाहायला मिळणं दुर्मीळ होऊन बसलं आहे. जर तुम्ही खरंच अशा सिनेमाच्या शोधात असाल तर विक्रांत मास्से आणि श्वेता त्रिपाठीचा नेटफ्लिक्सवर आलेला ‘कार्गो’ तुमच्याच साठी आहे.

आरती कादव या दिग्दर्शिकेचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि तिने विषय आणि सादरीकरणाच्या बाबतीत मोठी झेप घेतलेली तुम्हाला पाहायला मिळू शकते. याआधी तिने टाइम मशीन नावाची शॉर्ट फिल्म काढली आहे ही तिची पहिली फुल लेंथ फीचर फिल्म आहे.

भारतामध्ये सायन्स फिक्शन चित्रपट अतिशय कमी प्रमाणात येतात त्यामुळे हे जॉनर आवडणाऱ्यांसाठी देखील हा चित्रपट पर्वणी ठरू शकतो. या चित्रपटाची कथा २०२७ मधली आहे.

मृत्यूनंतर आपलं काय होतं? पुनर्जन्म होतो असं म्हणतात. पण तो नेमका कसा होतो? या जन्मातल्या आठवणींचं काय होतं. या जन्मात जे सुख-दुःख भोगलंय किंवा सोसलंय त्यांचं काय होतं? असे अनेक प्रश्न आपल्या पडतातच. त्याच प्रश्नांचा कल्पना विस्तार म्हणजे हा चित्रपट आहे.

भारतीय पुराणकथा आणि विज्ञान-तंत्रज्ञान या दोन संकल्पनांचा आधार घेऊन कार्गोची कथा आकार घेते. ज्या प्रमाणे यमदूत पृथ्वीवरील लोकांना घेऊन जातात, अगदी तसंच काम करणारी एक हाय-फाय संस्था आहे. तिचं नाव आहे इंटरप्लानेटरी स्पेस ऑर्गनायजेशन (IPSO). ही संस्था ‘राक्षस’ चालवत आहेत. पण राक्षसांनी आता फार प्रगती केली आहे. पृथ्वीवर मृत झालेल्या व्यक्तीला नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने स्पेसमध्ये आणलं जातं. त्या व्यक्तीचं पूर्ण चेक अप केलं जातं. जर त्या व्यक्तीचं काही दुखत खुपत असेल तर ते बरं केलं जातं. त्या व्यक्तीच्या आठवणी संपूर्णपणे मिटवल्या जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाली की ती व्यक्ती पूनर्जन्म घेण्यासाठी पात्र ठरते. या ठिकाणी जी मृत व्यक्ती येते त्या व्यक्तीला कार्गो म्हटलं जातं.

प्रहस्थ (विक्रांत मास्से) हा IPSOचा एक कर्मचारी आहे. आणि हो तो राक्षस देखील आहे. पण हे राक्षस काही चित्रविचित्र दिसणारे नाहीत तर अगदी सर्वसामान्यांसारखेच आहेत. स्पेसशिप वर येणाऱ्या कार्गोवर प्रहस्थ सर्व प्रक्रिया करत असतो. गेल्या ७५ वर्षांपासून तो हेच काम करत आहे. त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येतं. ते म्हणजे युविष्का (श्वेता त्रिपाठी) त्याची असिस्टंट म्हणून कामाला येते. त्यानंतर प्रहस्थच्या एकसुरी आयुष्यात बदल घडतो. पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडतं, ते हे काम किती दिवस करतात कसं करतात हे चित्रपटातच पाहणे योग्य राहील.

वरवर, कार्गो एक सायन्स फिक्शन चित्रपट वाटत असला तरी या चित्रपटाने मानवी आयुष्यासंबंधीच्या अनेक मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे. राक्षस असो वा मानव त्याच्या वाट्याला येणारा एकटेपणा टाळता येण्यासारखा नाही हे देखील या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.

मृत्यूनंतर जेव्हा लोकांना हे कळतं की चांगले आणि वाईट हे लोक इथेच येतात आणि स्वर्ग किंवा नर्क असं काही नाहीये तेव्हा त्यांचे हावभाव पाहण्यासारखे असतात. म्हणजे आम्ही पृथ्वीवर नाहकच चांगलं वागलो असे अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात.

युविष्का देखील आपल्याला विचार करायला भाग पाडते. ती म्हणते जर आपण मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पूर्ण स्मृती मिटवणार आहोत तर आयुष्य जगण्यात तरी काय अर्थ आहे.

विक्रांत मास्से आणि श्वेता त्रिपाठी व्यतिरिक्त चित्रपटात तिसरी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे ती नंदू माधवची. हा प्रहस्थचा बॉस आहे आणि आपल्या रूटीनबाबतीत अगदी काटेकोर आहे. त्याच बरोबर टीव्हीएफ फेम बिस्वपती सरकार हा ‘लोनलीलेस डिटेक्टिव्ह’च्या भूमिकेत आहे. याच्या आयुष्याचा विरोधाभास असा की इतरांच्या आयुष्यातला एकटेपणा घालवण्याचं वचन देणाऱ्याच्याच आयुष्यात एकटेपणा आहे. त्याची छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते.

चित्रपटात पुराणकथांमधील अनेक संदर्भ ऐकायला मिळतात. जसं की प्रहस्थ हे नाव रावणाच्या सेनापतीचं आहे. पृथ्वीवर सध्या एक पॉप स्टार गाजत आहे तिचं नाव शूर्पनखा आहे अशी अनाउन्समेंट देखील ऐकायला मिळते.

या चित्रपटाची तुलना आपण हॉलिवुडच्या चित्रपटांशी करू शकत नाही कारण इतकं बजेट या चित्रपटाचं नाही. व्हीएफएक्सचा वापर मर्यादित स्वरूपात आहे. पण कथा-पटकथा दमदार असल्यामुळे त्याकडे प्रेक्षक कानाडोळा करू शकतात.

नेहमी जसे चित्रपट पाहायला मिळतात तसा कार्गो निश्चितपणेच नाही. अभिनव संकल्पेनाला मूर्त स्वरूप देण्याचा दिग्दर्शिकेचा प्रयोग यशस्वी झाला आहे असं आपण म्हणू शकतो. चित्रपट पाहताना अनेक प्रश्न पडतात. कथे संदर्भातील प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात पण आयुष्य काय आहे आणि आयुष्यानंतर पुढे काय असतं हे प्रश्न आपल्या मनात चित्रपट संपल्यावर बराच काळ रेंगाळत राहतात हेच या चित्रपटाचं यश आहे.

मूळ कलाकृती कशी असते याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा.

  • पंकज कुलकर्णी