कुली नंबर १ हा अत्यंत भंपक, असंवेदनशील आणि हसू न येणारा सो कॉल्ड कॉमेडी चित्रपट आहे.

कुली नंबर १ हा अत्यंत भंपक, असंवेदनशील आणि हसू न येणारा सो कॉल्ड कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पायरीवर हा सपेशल अपयशी ठरला आहे. सुरुवातीला दहा मिनिटांतच हा चित्रपट पाहायला का सुरुवात केली याचा पश्चाताप व्हायला लागेल. या चित्रपटाची एक जमेची बाजू आहे ती म्हणजे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला आहे त्यामुळे तो हवं तेव्हा बंद करता येतो.

१९९५ साली गोविंदा, करिष्मा कपूर आणि कादर खान यांचा कुली नं १ हा चित्रपट आला होता. त्यानंतर डेव्हिड धवन आणि गोविंदाने नंबर वन चित्रपटांची मालिकाच सुरू केली होती. ९० च्या काळात वाढलेल्या मुला-मुलींना अजूनही या चित्रपटांची आठवण येत असेल. कदाचित त्या नॉस्टेल्जियाचा वापर करून पुन्हा चित्रपट निर्मिती करावी असा विचार डेव्हिड धवनने केला असू शकतो आणि त्यातून या चित्रपटाची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे.

जुन्या चित्रपटाची कथा अशी आहे की एक कुली एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्या वडिलांवर इंप्रेशन मारण्यासाठी तो स्वतः श्रीमंत आहे असं दाखवतो. नव्या चित्रपटाची कथा देखील अशीच आहे. फक्त फरक इतका आहे की नव्यामध्ये सगळंच भंगार आहे. तो सुद्धा तेच करतो पण जास्त विचित्र पद्धतीने.

राजू (वरूण धवन) कुली आहे. सुटकेसला चाकं असले तरी तो त्या डोक्यावरच उचलतो. २५ वर्षांपूर्वी कुली नं. १ आला होता तेव्हा तशाच सुटकेस होत्या. आता काळ बदलला प्रेक्षक बदलले पण डेव्हिड धवन अजूनही जुन्याच काळात आहे.

या चित्रपटामुळे एकदा पण हसू फुटत नाही उलट जिवाचा त्रागा व्हायला लागतो. प्रत्येक पात्रं हे आधीच्या पात्रापेक्षा थिल्लर आणि असमजूतदार आहे. लॉजिकचा आणि त्यांचा छत्तीसचा आकडा हा प्रत्येक गोष्टीतून जाणवतो.

आधीच असह्य असलेल्या स्क्रीनप्लेला फराद सामजीच्या संवादाने भेसूर बनवलं आहे. फराद सामजी तेच आहेत ज्यांनी लक्ष्मी आणि हाउसफुल 3 चे डायलॉग लिहिले आहेत. इतकी त्यांची ओळख पुरे.

प्रत्येक बाबतीत समोरच्या व्यक्तीच्या वैगुण्याची खिल्ली उडवून पाचकळ विनोद मारले आहेत. कुणाच्या स्थूलपणावर, अडखळत बोलण्यावर विनोद केल्यास एखाद्या व्यक्तीला कसं वाटू शकतं याचा विचार डायरेक्टरने जराही केलेला दिसत नाही. महिलांवर केलेले विनोद तर अतिशय थिल्लर आहेत.

हे सर्व कमी होतं म्हणून की काय प्रत्येक जण ओव्हरअॅक्टिंग करतो. जेफरी रोजारिओ (परेश रावल) हा लोभी बाप आहे. जो पण श्रीमंत माणूस पाहतो त्यांच्याशी आपल्या मुलींचं लग्न लावून देण्याची त्याची इच्छा असते. प्रत्येक वाक्याला यमक जुळवण्याच्या त्याच्या सवयीमुळे शिसारी येते.

वरूण धवन शाखरूख खान, देव आनंद, दिलीप कुमार, मिथुन चक्रवर्ती यांची मिमिक्री करतो. सर्वांत टाकावू मिमिक्रीसाठी जर स्पर्धा झाली तर त्यात वरूण धवन नक्कीच पहिला येईल. इतकं करुनही त्याचा अभिनय एकसुरीच आहे. लिखाणात इतका आळशीपणा केला आहे की सारा अली खानचे सिनेमातही नाव साराच आहे. ती फक्त तिथे नावालाच हजर आहे असं वाटतं.

हा चित्रपट पाहून तुम्हाला काहीच मिळणार नाही. जर कुली नंबर १ पाहायचाच असेल तर गोविंदाचा पाहा निदान मनोरंजन तरी होईल. हा चित्रपट पाहिला तर स्वतःवरच हसायची वेळ येईल.

  • पंकज कुलकर्णी