हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राचा हा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा.

सुशांत सिंह राजपूत…. हिंदी मालिकांमधून प्रवास सुरू करून काय पो छेते छिछोरेव्हाया  एम.एस. धोनीपर्यंतच्या प्रवासातून कोट्यवधी सिनेप्रेमींच्या मनात घर केलेला अभिनेता!  केवळ अभिनयाने नाही तर विज्ञान, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, पुस्तकं अशा व्यापक विश्वात रमणारा अवलिया आपल्या मनावर वेगळी छाप सोडून कायमचा निघून गेला.

सुशांतच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्य, चित्रपटांमधील विरोधाभास, चित्रपटसृष्टीतील घराणेशाही आणि त्यातून या सिनेविश्वात स्वबळावर पाय रोवू पाहणाऱ्या गुणी कलाकारांवर होणारे अन्याय अशा चर्चांना नव्याने वाचा फुटली.

अर्थात त्याचे स्वतःचे चित्रपट, पटकथा, त्यातील त्याच्या तोंडून वदवले गेलेले संवाद आणि वास्तव आयुष्यात झालेला त्याचा दुर्दैवी अंत यावरून रुपेरी पडद्यावरील झगमगाटाच्या मागचा विरोधाभास प्रकर्षाने समोर येतोच.

या चर्चेबरोबरच सुशांतचा येऊ घातलेला चित्रपट दिल बेचाराची उत्सुकता वजा खंत त्यांच्या चाहत्यांना आणि सिनेमाप्रेमींना होतीच. गेली दोन वर्षे रखडलेला दिल बेचारा अखेर शुक्रवारी डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला. हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राचा हा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा.

२०१४ मध्ये जॉन ग्रीनच्या द फॉल्ट इन अवर स्टार्सया कादंबरीवर आधारित चित्रपट जॉश बून या अमेरिकी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला. दिल बेचाराहा द फॉल्ट इन अवर स्टार्सचा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि नायिका संजना संघीने ऑगस्टस आणि हेजल या मूळ भूमिकांची भारतीय आवृत्ती असलेल्या मॅनी (इमॅनुएल राजकुमार ज्युनियर) आणि किझी बासू या भूमिका अतिशय ताकदीने वठविल्या आहेत.

किझीची भूमिका केलेल्या संजना संधीचा सुद्धा हा प्रमुख नायिका म्हणून पहिलाच सिनेमा आहे. याआधी छोट्या तरीही उल्लेखनीय भूमिकांमधूनही आपल्या समोर आली होती. परंतु, किझी बासू ही भूमिका तिने अतिशय आत्मीयतेने साकारली आहे हे नक्की.

चित्रपटातील खेळकर, हसरा, अवखळ सुशांत मॅनीच्या भूमिकेत जिवंतपणा आणतो. वास्तवातही तो कित्येकांच्या आठवणीत तसाच राहील. पण या पार्श्वभूमीवर त्याचा वास्तवातला आणि चित्रपटातला संघर्ष आणि अंत हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल.

स्वस्तिका मुखर्जीने साकारलेली किझी बासूच्या आईची भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे. कथेबरोबर उलगडत जाणाऱ्या भूमिकेच्या छटा तिने अतिशय सहजतेने आणि संवेदनशीलतेने अभिनयात आणल्या आहेत. सैफ अली खानच्या भूमिकेचा स्क्रीन टाईम कमी असला तरी भूमिका पटकथेच्या दृष्टीने महत्वाची आहे. तरीही अपेक्षित तितक्या प्रभावीपणे ती पडद्यावर मांडली गेलेली नाही.

या चित्रपटाचं वैविध्यपूर्ण इमोशन पॅलेटहे गीतकार- संगीतकार ए.आर. रेहमानने प्रत्येक गाण्याच्या चालीत आपल्या खास शैलीत उतरवलं आहे .

दिल बेचाराचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नाही याबद्दल अनेक सिनेरसिकांनी विविध माध्यमांद्वारे आपली निराशा देखील व्यक्त केली. तरीही सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच सोशल मीडियावरचे अनेक रेकॉर्ड्स ट्रेलर आणि म्युझिक ट्रॅक्सनी मोडले. सुशांतचा शेवटचा सिनेमा म्हणून दिल बेचारा चाहत्यांच्या मनात घर करून राहिलच. परंतु, तटस्थपणे या कलाकृतीकडे पाहायचे झाले तर पटकथा, दिग्दर्शन आणि सिनेमॅटिक्स मध्ये फारसे नाविन्य दिसून येत नाही.

हिंदी सिनेमांमधील इतर बऱ्याच नव्या जुन्या रोमँटिक ट्रॅजेडीज सारखाच हाही चित्रपट बॉलिवूडच्या ठराविक साच्यातून काढलेला वाटतो. सुशांतसारख्या गुणी आणि लोभस अभिनेत्याच्या अकाली जाण्याने या चित्रपटाला एक शोकास्पद सहानुभूतीची किनार राहिल, हे नक्की.

  • राही पाटील

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *